अहिल्यानगर: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वादात सापडलेले श्रीपाद छिंदम हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात विजयी ठरले आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधून त्यांनी तब्बल २ हजार ८०० मतांनी विजय मिळवला असून, या निकालामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून बहुजन समाज पार्टीकडून श्रीपाद छिंदम, तर भाजपकडून सागर मुर्तडकर, मयुरी जाधव आणि शीतल ढोणे हे उमेदवार विजयी झाले आहेत. निकालानंतर छिंदम यांनी मतदारांचे आभार मानत, प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच निवडणूक काळात दहशतीचं आणि जातीवादाचं राजकारण झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सात वर्षांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही श्रीपाद छिंदम यांनी विजय मिळवला होता. तत्कालीन प्रभाग क्रमांक ९ मधून त्यांनी सुमारे २ हजार मतांनी विजय संपादन केला होता. मात्र त्या वेळी त्यांच्या भावाने, श्रीकांत छिंदम यांनी मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएमची पूजा केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तडीपार असूनही निवडणूक आणि वादांचा इतिहास
सात वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या काळात श्रीपाद छिंदम हे तडीपार होते. जिल्हा प्रशासनाने छिंदमसह पाच जणांना तडीपार केलं होतं. याच काळात, शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे छिंदम यांच्यावर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला होता.
या प्रकरणानंतर त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच ते त्या काळात शहराचे उपमहापौर असतानाच त्यांचं नगरसेवकपदही रद्द करण्यात आलं होतं. अशा पार्श्वभूमीवर, यंदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला विजय अनेक प्रश्न उपस्थित करणारा ठरत असून, राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.