पत्र्याच्या शेडमधून राज्यसभेपर्यंत! ही माझी नाही, अडीच कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी; डॉ. ज्योती वाघमारे

Share

मुंबई: शिवसेनेच्या आक्रमक प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा अर्ज भरला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय शिरसाट, आमदार डॉ. मनिषा कायंदे, ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. ज्योती वाघमारे भावुक झाल्या. “राजकारणात येण्यासाठी मोठं आडनाव किंवा मोठ्या बापाचा आधार असावा लागतो, असं अनेकदा म्हटलं जातं. मी मोठ्या बापाची मुलगी नाही. पण पक्षासाठी केलेली प्रामाणिक मेहनत आणि काम याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलीला संधी दिली,” असे त्या म्हणाल्या.

“ही उमेदवारी केवळ माझी नसून राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींची आहे,” असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. तसेच ही उमेदवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण चळवळीची आणि संविधानाने दिलेल्या समान हक्कांची असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. वाघमारे म्हणाल्या की, त्यांच्या आई-वडिलांना राज्यसभा म्हणजे काय हेही पूर्णपणे माहिती नाही. “पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या, अनवाणी शाळेत जाणाऱ्या मुलीला आज राज्यसभेची उमेदवारी मिळाली, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे त्या म्हणाल्या. जातीपातीच्या भिंती मोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम उपमुख्यमंत्री शिंदे करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले. त्याच विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मागील काही वर्षांत पक्षाची भूमिका ठामपणे मांडली असून त्या राज्यसभेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संघर्षातून उभी राहिलेली वाटचाल

सोलापूरच्या मूळ रहिवासी असलेल्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. त्यांनी सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयात सुमारे दहा वर्षे प्राध्यापिका म्हणून काम केले. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड अशा पाच भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर तसेच बांधकाम मजूर म्हणूनही काम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत डॉ. वाघमारे यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले.

सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांवर व्याख्याने दिली आहेत. मागील १५ वर्षांपासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत.

एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून सध्या त्या पक्षाच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. विविध चर्चासत्रांमध्ये पक्षाची भूमिका सडेतोडपणे मांडणाऱ्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *