होर्मुझच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाज बुडाले; तरंगणारे आयफोन आणि महागड्या अत्तरांसाठी लोकांची बोटींतून धावपळ

Share

अबू धाबीः संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) व्यवस्थापनाखालील एक कंटेनर जहाज ‘जीएफएस प्राईड’ला आग लागून ते बुडाल्यानंतर, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये हजारो आयफोनचे बॉक्स आणि महागड्या परफ्यूमच्या बाटल्या तरंगत असल्याचे व्हायरल व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे. जहाजाच्या अवशेषांजवळ पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या विखुरलेल्या मौल्यवान वस्तू गोळा करण्यासाठी लहान बोटींमधून आलेल्या लोकांचा धावपळ चालू होती. जहाज बुडण्यापूर्वी जहाजावरील सर्व २१ कर्मचारी कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर पडले.

सिंगापूरचा ध्वज असलेले आणि अंदाजे २,५०० कंटेनर वाहून नेण्याची क्षमता असलेले ‘जीएफएस प्राईड’ हे जहाज दुबईहून येत असताना त्याचे प्रचंड नुकसान झाले. हे जहाज कसे नष्ट झाले याबद्दल परस्परविरोधी बातम्या प्रसृत होत आहेत.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कोअरने दावा केला आहे की, अनधिकृत आणि असुरक्षित मार्गाने प्रवास केल्यानंतर हे जहाज पाणसुरुंगावर आदळले असावे. सिंगापूरच्या सागरी आणि बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या मते, एका अज्ञात वस्तूने जहाजाला धडक दिल्याने ते बुडण्यापूर्वी मोठी आग लागली.

जहाजावर स्फोट कसा झाला आणि ते कसे बुडाले याचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके आणि सागरी सुरक्षा विश्लेषक या भागाची पाहाणी करत आहेत.

ऑनलाइन प्रसारित होत असलेल्या दृश्यांमध्ये खुल्या पाण्यावर पुठ्ठ्याची पाकिटे आणि ब्रँडेड बॉक्स तरंगताना दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी चित्रित केलेल्या फुटेजमध्ये, लहान मासेमारीच्या मोटारबोटींमधील व्यक्ती समुद्रातून तरंगणाऱ्या परफ्यूमच्या बाटल्या, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि आयफोनचे बॉक्स गोळा करताना दिसत आहेत.

‘जीएफएस प्राईड’ हे जहाज युएई-स्थित ‘जीएफएस शिप मॅनेजमेंट’द्वारे चालवले जात होते आणि ते प्रादेशिक बाजारपेठांसाठी व्यावसायिक ग्राहकोपयोगी माल वाहून नेत होते.

जागतिक तेल पुरवठ्याच्या पाचवा भाग वाहून नेणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीतील या महत्त्वपूर्ण अरुंद मार्गावर सागरी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली असतानाच ही घटना घडली आहे. ४८ तासांच्या कालावधीत, आंतरराष्ट्रीय व्यापार संस्थांनी व्यापारी मालवाहू जहाजांना लक्ष्य करून केलेल्या अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची नोंद घेतली आहे.

एका क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर काही आठवड्यांनी, अँटिग्वा आणि बार्बुडा ध्वजांकित मालवाहू जहाज ‘केप डाओ’ देखील जवळच्याच पाण्यात बुडाले. नौदलाच्या जहाजांवर सक्रिय पाळत ठेवल्याचे कारण देत, अमेरिकी सैन्याने ओमानच्या आखातात इराणशी संबंधित एक जहाज अडवून नष्ट केले.

प्रादेशिक अधिकाऱ्यांनी असा इशारा दिला आहे, की जलमार्गातील सततच्या अडथळ्यांमुळे जागतिक पुरवठा साखळी आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारांना थेट धोका निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!