वाशिमः भेडसावणाऱ्या विजेची समस्या आणि वन्यप्राण्यांमुळे पिकांची होणारी नासधूस, याबाबत येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यापुढे चिंता व्यक्त केली. राज्य सरकारने याबाबत उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी प्रकट केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्य राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. आगामी निवडणुकीसाठी विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागांना भेटी देण्याचे सत्र सुरू केले आहे. शरद पवार गटानेही विविध जिल्ह्यांमध्ये बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनीही राज्यभर दौरे आयोजित केले आहेत.
सध्या ते वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. दुबार पेरणी करूनही पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे सोयाबीनचे पीक जळून गेल्याने, शेतकरी हतबल झाले आहेत. आता पुढे काय, याची चिंता त्यांना भेडसावू लागली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी आणि शेतमजुरांना प्रती कुटुंब २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
वाशिमच्या दौऱ्यावर असतानाच रोहित पवार यांच्या उपस्थितीत कारंजामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा होणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व रोहित पवार करणार आहेत. मोर्च्यापूर्वी ते पसरणी, धामणी या गावांतील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहेत. वाशिमध्ये पावसाने गेल्या ४५ दिवसांपासून ओढ दिली आहे. त्यामुळे सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांना फटका बसला आहे.