शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; चिन्ह गोठविणार की प्रदान होणार?

Share

नवी दिल्लीः शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा युक्तीवाद यापूर्वीच पूर्ण झाला आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह जर मिळणार नसेल, तर ते गोठवण्यात यावे, असा युक्तीवाद ठाकरे गटातर्फे गेल्या महिन्यात मांडण्यात आला होता. ऑगस्टअखेर शिंदे सेनेतर्फे युक्तीवाद सुरू झाला आहे. आजच्या युक्तीवादात कोणते मुद्दे मांडण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरी शिवसेनो कोणाची यावर गेल्या चार वर्षात खूप वादविवाद झाले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी स्वीकारली आहे. शिवसेना पक्ष-चिन्हाच्या दाव्यावर आज शिंदे सेनेकडून युक्तीवाद करण्यात येईल. यापूर्वी उद्धव सेनेकडून विधानसभा अध्यक्ष, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेला आक्षेप नोंदवण्यात आला आहे. विधिमंडळातील पक्ष आणि राजकीय पक्षाबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीत या मुद्याला कसे उत्तर देण्यात येते आणि शिंदे सेनेकडून कोणत्या खटल्याचा आधार घेण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली होती. केवळ आमदारांच्या बहुसंख्येवर राजकीय पक्षाची मालकी ठरवता येणार नाही, पक्षाची संघटनात्मक रचना, मूळ घटना ही सर्वात महत्त्वाची असल्याचा युक्तीवाद सिब्बल यांनी केला होता. विधिमंडळ पक्षातील फूट ही मूळ राजकीय पक्षातील फूट ठरू शकत नाही, असा युक्तीवाद करण्यात आला होता. त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षाची फोड करून त्यासंदर्भात काही खटल्यांचा दाखला ही दिला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षात अचानक बदल करण्यात आला. २०१३ मध्ये पक्ष प्रमुख हे पद निर्माण करण्यात आले. २०१८ मध्ये पक्ष घटनेत बदल करण्यात आला. हा सर्व प्रकार लोकशाही प्रक्रियेला धरून नव्हता. पक्षात आणि कनिष्ठ पदांसाठी कधीही निवडणूक घेण्यात आली नाही. एकाधिकारशाहीवर पक्षाचे कामकाज सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाची घटना, पक्ष संघटना आणि विधिमंडळ पक्षाशी संवाद साधण्याचा आणि निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचा युक्तीवाद गेल्या सुनावणीदरम्यान करण्यात आला.सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!