मुंबईत येऊन आझाद मैदानावर एकट्यानेच उपोषण करण्याचा मनोज जरांगेंचा निर्धार

Share

जालना: राज्य प्रशासन आणि पोलिसांनी मुंबईत उपोषणासाठी परवानगी नाकारली असली, तरी मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन एकट्यानेच उपोषण करण्याचा निर्धार प्रकट केला आहे. त्यांच्या उपोषणाचा रविवारी १६ वा दिवस होता. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंदोलनासाठी जाणार असल्याचे स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षेचे कारण देत मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली होती. या निर्णयाचा समाचार घेताना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. सरकार मराठा समाजाच्या ताकदीला घाबरले आहे. गणेशोत्सवादरम्यान गदारोळ घडवून आणायचा आणि त्याचे खापर मराठा समाजावर फोडायचे, असा सरकारचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.

पाणी, सलाईन आणि औषधोपचार नाकारल्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या अध्यादेशावर सरकारकडून थेट अंमलबजावणी व्हावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, शासनाशी चर्चेचे दरवाजे अद्याप उघडे आहेत. खुल्या मैदानात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत; परंतु आम्हाला पोकळ आश्वासने नको, थेट अंमलबजावणी हवी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणे आणि गणेशभक्तांची असुविधा योग्य नाही, त्यामुळे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत, काही मागण्या अशा आहेत की ज्या न्यायालयात आहेत. या मागण्या तूर्त मान्य केल्या जाऊ शकत नाहीत, आम्ही चर्चेची दारे कधीही बंद केलेली नाहीत. न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांच्या बाहेर जाऊन आम्हाला काम करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. रविवारी आझाद मैदान पोलिसांनी पहिला अर्ज फेटाळल्यानंतर मनोज जरांगे यांच्यावतीने नव्याने उपोषणाची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी कठोर भूमिका घेत दुसऱ्यांदाही या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवानंतर जरांगेंच्या उपोषणाला आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी परवानगी देण्यात येईल, असे पत्रही मुंबई पोलिसांनी दिल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे ५,००० वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत भाविकांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई अतिशय संवेदनशील मानली जाते. आझाद मैदानातील ७,००० चौरस मीटर जागेत नियम २०२५ नुसार कमाल ५,००० आंदोलकच समावू शकतात. मात्र जरांगेंनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. लाखो आंदोलक मुंबईत आल्यास दक्षिण मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये (जी.टी., कामा, सेंट जॉर्ज, बॉम्बे हॉस्पिटल), न्यायालये आणि आर्थिक केंद्रांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर, शांतता राखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जरांगे यांनी मराठा बांधवांना तूर्त मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. आपल्यासोबत केवळ १० सहकारी आणि दोन रुग्णवाहिका असतील. आपण एकटेच मुंबईकडे जाऊ. आता तरी सरकार आपल्याला परवानगी देणार का, हे पाहाले लागेल, असे त्यांनी सांगितले.

One thought on “मुंबईत येऊन आझाद मैदानावर एकट्यानेच उपोषण करण्याचा मनोज जरांगेंचा निर्धार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!