धाराशिवः मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे, असे आंतरवली सराटी येथील अधिकृत सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आंदोलकांनी दोन पावले पुढे यावे, असे आवाहन सरकारने एक पत्रकार परिषद घेऊन केले आहे.
आंदोलकांनी धुळे-सोलापूर मार्गावरील महाकाळा येथे रास्ता रोको केल्यामुळे, या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मनोज जरांगे यांच्याकडे सरकारते पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप करणाऱ्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच महामार्गावरील अंकुशनगर परिसरातही आंदोलकांनी रस्ता रोखून धरला होता. एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही देण्यात येत होत्या.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सुमारे दोन तासांनी महामार्ग मोकळा करण्यात यश आले. पुण्यातही मनोज जरांगे यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी सरकारकडे केली.
सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. धाराशिवमध्ये व्यापाऱ्यांनीही आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे.