अशोक सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लादले अत्यंत कडक निर्बंध…

Share

श्रीरामपूरः येथील प्रतिष्ठित अशोक सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अत्यंत कडक निर्बंध लादले आहेत. बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि वाढत्या थकीत कर्जांमुळे, पुढील सहा महिन्यांसाठी बँकेच्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. या बँकेच्या एकूण १३ शाखा आहेत.

आरबीआयच्या या कारवाईमुळे राज्यातील ठेवीदार आणि खातेदारांमध्ये घबराट पसरली आहे. बँकेच्या कामकाजात आणि आर्थिक शिस्तीत वारंवार सुधारणा न झाल्यामुळे, रिझर्व्ह बँकेला हे कठोर पाऊल उचलावे लागले आहे. बँकेकडे सध्या ३८० कोटी रुपयांच्या ठेवी असून, बँकेने तब्बल ४२३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. अहिल्यानगर येथील शाखेत चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप झाले असून, त्याची वसुली होऊ शकलेली नाही.

बँकेतील रोख रकमेची तूट निर्माण झाल्याने ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी आरबीआयने हे निर्बंध लादले आहेत. बँकेचे मुख्य सूत्रधार आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठेवीदारांना घाबरून जाऊ नये असं आवाहन केलं.

बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना डीआयसीजीसी विमा संरक्षण प्राप्त आहे. या ठेवीदारांना ९० दिवसांच्या आत (३ महिने) त्यांचे पैसे मिळतील. ज्यांच्या ठेवी ५ लाखांपेक्षा जास्त आहेत, त्यांना सहा महिन्यांच्या निर्बंधांचा काळ संपेपर्यंत थांबावे लागणार आहे, असे मुरकुटे यांनी सांगितले.

ते म्हणाले, की बँकेचा परवाना रद्द झालेला नाही. बँकेचे कामकाज केवल ६ महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहे. यापूर्वी नाशिक मर्चंट आणि गौतम बँकेवरही असेच निर्बंध आले होते, मात्र, त्या बँका पुन्हा सुस्थितीत आल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.

श्रीरामपूरसह इतर शाखांसमोर गेल्या ५ ते ६ दिवसांपासून पैसे काढण्यासाठी खातेदारांनी मोठी गर्दी केली आहे. आरबीआयच्या आदेशानुसार बँकेला केवळ कर्मचाऱ्यांचे पगार आणि दैनंदिन कार्यालयीन खर्च करण्याची परवानगी आहे. नवीन कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे किंवा पैसे काढण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *