जालना: मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. आज, जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असून, आजही हजारोंची गर्दी दिसून येत आहे. तर, दुसरीकडे परभणीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाने आज एका मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनावरून मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, खासदार संजय जाधव यांना दूरध्वनी करून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द करा, अन्यथा आपल्याला तिथे यावे लागेल, असा इशारा दिला आहे.
परभणीत शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांना थेट दूरध्वनी करून जरांगे पाटील यांनी फैलावर घेतले आणि कार्यक्रम तातडीने रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार बंडू जाधव यांच्या पुढाकाराने परभणीत शिवसेनेची सभा आणि शेतकरी मेळावा, अशा दुहेरी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून पक्षप्रवेश आणि शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी या सभेला तीव्र विरोध दर्शवला आहे.
शिंदेंची सभा होणारच! बंडू जाधव यांचे जरांगेंना थेट आव्हान…
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीतील सभा रद्द करा, हा मनोज जरांगे पाटील यांचा इशारा खासदार बंडू जाधव यांनी फेटाळून लावला आणि ही सभा नियोजित कार्यक्रमानुसार होणारच, अशी ठाम भूमिका घेतली आहे.
मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्रावरून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्यात थेट राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. जरांगे पाटील यांनी परभणीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा तातडीने रद्द करण्याचा इशारा फोनवरून दिला आणि बंडू जाधवांचा ‘कार्यक्रम’ करणार असल्याचा इशारा दिला होता.
आपला इशारा डावलून परभणीतील सभा झाल्यास, आपल्याला परभणीत यावे लागेल, असे खुले आव्हान, जरांगे यांनी संजय जाधव यांना दिले होते. मात्र, आता शिवसेना शिदे गटाने ही सभा ठरलेल्या वेळेनुसार पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.