जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबला; छुप्या हालचालींवर कार्यकर्त्यांची करडी नजर

Share

मुंबई: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीचा अधिकृत जाहीर प्रचार गुरुवारी रात्री समाप्त झाला. येत्या शनिवारी (दि. ७) मतदान होणार असून, प्रचार बंदीच्या कालावधीत छुप्या पद्धतीने होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

पुढील काही तास प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या गुप्त हालचाली टिपण्यावर कार्यकर्त्यांचे लक्ष केंद्रित राहणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने यंदा उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी २९९ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी तब्बल ५२८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

यंदाच्या निवडणुकीत काही तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत, तर काही तालुक्यांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे जिल्ह्यात एकही मोठी जाहीर किंवा भव्य प्रचार सभा घेण्यात आली नाही. तसेच काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांकडूनही कोणत्याही प्रमुख नेत्यांच्या मोठ्या जाहीर सभा झाल्या नाहीत.

त्यामुळे बहुतांश ठिकाणी प्रचार साध्या पद्धतीने झाला. वैयक्तिक संपर्क, छोट्या बैठका, गाठीभेटी आणि घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर उमेदवारांनी भर दिला. गुरुवारी रात्री अधिकृत प्रचार थांबल्यानंतरही स्थानिक कार्यकर्ते मतदारांच्या घरी भेटी देत मतदानाचे आवाहन करत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मतदारांपर्यंत व्होटर स्लीप पोहोचल्या आहेत की नाही, पोलिंग एजंटची नेमणूक, मतदान केंद्रांवर बूथ उभारणी, तसेच तळातील कार्यकर्त्यांसाठी नाश्ता-पाण्याची व्यवस्था यावर उमेदवारांच्या यंत्रणांचा भर आहे. फोडाफोडीचे राजकारण, नाराजांचे मन वळविण्याचे प्रयत्न आणि आपली हक्काची मते सुरक्षित राखण्यासाठी कार्यकर्त्यांना मतदानपूर्व रात्री जागता पहारा द्यावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *