पुणे: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात मोठी दरी निर्माण झाली असताना ठाकरे अन शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आली आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरे यांचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
बाबाजी काळे यांनी म्हटले की, ‘खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे. त्यांच्या पत्नी चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी उभ्या राहिल्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही युती म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे असो वा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळ हा निर्णय चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित असेल. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीत आम्ही स्वबळावर लढतोय.’
दरम्यान, मुंबई महानगर पालिका निवडणुकीबाबत मुंबईतील आमदार खासदार आणि नेत्यांना बैठकीत मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या देताना म्हणाले, आपण आपली माणसं मोठी केली तर पक्ष मोठा होणार आहे, पक्ष मोठा झाला की आपणही मोठे होणार. पालिका निवडणुकीत जोमाने कामाला लागा, कोण एकत्र येत आहे त्याकडे लक्ष देऊ नका. माझंही सगळीकडे लक्ष आहे.