मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (सोमवार) 13वा स्मृतिदिन असून, राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे देखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, चंदू मामा, रश्मी ठाकरे एकत्र स्मृतीस्थळी थोडावेळ बसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र बघता उपस्थित शिवसैनिक भावनिक झाल्याचे दिसून आले.
साहेब,
विनम्र अभिवादन! pic.twitter.com/auvrBz72mv— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 17, 2025
संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव 31 ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. मात्र, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतीदिन असल्याने त्यांना राहावले नाही आणि ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि दर्शन घेतले.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या अनेक महिन्यात अनेकवेळा एकत्र दिसले. तसेच दिवाळी, भाऊबीजसह अनेक कार्यक्रमात ठाकरे कुटुंबही एकत्र आले होते. परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 11 वर्षांनंतर दादरमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी एकत्र दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची काहीवेळ चर्चाही झाली.