चर्चांना उधाण! बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारे राज ठाकरेंचे ट्वीट चर्चेत…

raj-thackeray
Share

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना अभिवादन करणारे ट्वीट केले आहे. मात्र, त्यांच्या या ट्वीटमुळे मात्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीस्थळावर जात अभिवादन केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जुना फोटो ट्वीट करत एक पोस्ट लिहिले आहे. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज यांनी आपल्या पोस्ट अप्रत्यक्षपणे शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच.

पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, (अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही !

फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *