आरक्षणावरच बोला, वैयक्तिक टीका व पक्षीय राजकारणापासून दूर राहा; संजय शिरसाट यांचा मनोज जरांगेंना इशारा

Share

छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे यांचा मुद्दा आरक्षणाबाबत आहे. त्यांनी केवळ त्याच विषयावर बोलावे. वैयक्तिक टीका आणि पक्षीय राजकारणापासून त्यांनी दूर राहावे, असा परखड इशारा राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी येथे दिला. मनोज जरांगे यांनी वैयक्तिक टीका आणि पक्षीय राजकारण करणे टाळावे. त्यांनी वैयक्तिक किंवा राजकीय विधाने केल्यास त्यांना टीकेला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.

मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, की राज्य सरकार पूर्ण तयारीत आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदत उपाययोजना जाहीर केल्या जातील. मुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर गंभीर चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांना मदत देणे अत्यावश्यक असून, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व मंत्र्यांना बाधित भागांना भेट देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, सर्व बाधित शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा आढावा घेणारा सरसकट पंचनामा तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी आचारसंहितेबाबत केलेल्या आरोपांनाही शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, रोहित पवार यांनी आधी आचारसंहितेचा अर्थ समजून घ्यावा. आणीबाणीच्या परिस्थितीत तत्काळ निर्णय घ्यावे लागतात आणि अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाची परवानगी घेऊनच दिलासा जाहीर केला जाऊ शकतो. त्यांनी रोहित पवार यांना निवडणूक आयोगाबद्दल अनावश्यक संशयाचे वातावरण निर्माण न करण्याचे आवाहन केले. कृषी मंत्र्यांवर रोहित पवार यांनी केलेल्या टिप्पणीबाबत शिरसाट म्हणाले की, त्यांनी राजकीय भाषा वापरू नये. त्यांनी आधी आपल्या पक्षातील वाद मिटवावेत आणि मग शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारसोबत काम करावे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. एका गंभीर विषयावर अशी टिप्पणी करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची तुलना डॉनशी करणे ही गंभीर बाब आहे. निवडणुकीदरम्यान लोक पाकिस्तानी झेंडे घेऊन नाचत असतील, तर त्याचा अर्थ पाकिस्तानी एजंट असा लावायचा का, असा प्रश्न त्यांनी संजय राऊत यांना विचारला. निवडणुकीतील पराभवानंतर लोकांवर ‘फिक्सिंग’चे आरोप करणे आणि विजयानंतर गप्प बसणे, असा दुटप्पीपणा केल्याचा आरोपही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलढाणा दौऱ्याचा संदर्भ देत शिरसाट म्हणाले की, या दौऱ्याला सुमारे तीन ते चार तासांचा विलंब झाला. त्यामुळे शिंदे यांना गाडीने प्रवास करावा लागला आणि ते काही शेतकऱ्यांना भेटू शकले नाहीत. एकनाथ शिंदे स्वतः शेतकरी कुटुंबातील आहेत. शेतकऱ्यांना भेटू न शकल्याबद्दल आणि दौऱ्याला झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आणि त्यांच्या वतीने माफी मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!