मुंबई: मुंबई महापालिकेत महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच, ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पाठिंबा आपल्या गटाला मिळाल्याची घोषणा केली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत गटस्थापनासाठी श्रीकांत शिंदे हे 53 शिवसेना नगरसेवकांसह कोकण भवनात पोहोचले होते. याच वेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील देखील आयुक्तांच्या कार्यालयात उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. काही वेळातच श्रीकांत शिंदे यांनी मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला अधिकृत पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं.
“विकासासाठी मनसेचा महायुतीला पाठिंबा” – श्रीकांत शिंदे
पत्रकारांशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. विकासाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला साथ दिली आहे. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यात आज बैठक होणार असून, महापौर व उपमहापौर कोण असतील याचा निर्णय घेतला जाईल. कल्याण-डोंबिवलीत महायुतीचाच महापौर बसणार आहे. वंचित बहुजन आघाडीनेही आम्हाला पाठिंबा दिला आहे.”
भाजपाला सोबत घेण्याचे संकेत, मात्र महापौरपदावर शिवसेनेचाच दावा
आतापर्यंत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत महापौरपदावरून चुरस पाहायला मिळत होती. मात्र मनसेच्या पाठिंब्यामुळे शिंदेंची शिवसेना बहुमताच्या अधिक जवळ पोहोचली आहे. त्यामुळे महापौरपदावर शिंदेंच्या शिवसेनेचाच उमेदवार असेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
श्रीकांत शिंदे यांनी भाजपालाही सोबत घेण्याचे संकेत दिले असले, तरी कल्याण-डोंबिवलीत महायुतीसोबत मनसे असा नवा राजकीय पॅटर्न आकाराला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील हा अनपेक्षित राजकीय बदल येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.