मुंबई महापौरपदावर सस्पेन्स; ठाकरे गटाकडून दोन नगरसेवकांना २४ तासांचा इशारा

Share

मुंबई: राज्यात १६ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या २९ महापालिकांच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजप–शिंदे गटाची शिवसेना यांची महायुती सत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. यामुळे आता महापौरपदाच्या निवडीसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबई महापौरपद महायुतीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, शिंदे गटाकडून कथितपणे “अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला” पुढे ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबई महापौरपदाचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेतही सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी घोडेबाजार सुरू झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ठाकरे गटाने आपल्या नगरसेवकांबाबत कठोर भूमिका घेतल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाची तातडीची बैठक; दोन नगरसेवक गैरहजर

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांची १९ जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला एकूण ११ पैकी ९ नगरसेवक उपस्थित होते. मात्र मधूर मात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बैठकीला गैरहजर राहिले.

या गैरहजेरीमुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली असून संबंधित नगरसेवक फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने दोन्ही नगरसेवकांना थेट अल्टिमेटम दिला आहे.

२४ तासांत पक्षात हजर राहण्याचे आदेश

दोन्ही नगरसेवकांनी २४ तासांच्या आत पक्षात हजर राहावे, अन्यथा अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून आलेल्या नगरसेवकांना पक्षशिस्त पाळणे बंधनकारक असून आदेश न पाळल्यास नगरसेवकपद धोक्यात येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

उमेश बोरगावकर गटनेतेपदी

दरम्यान, ठाकरे गटाने अनुभवी नेते उमेश बोरगावकर यांची गटनेता म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत उत्सुकता वाढली असून पुढील २४ तासांत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *