ना पक्षाचे बंधन, ना नेत्यांचा आदेश! मराठवाड्यात अब्दुल सत्तारांची ‘वन-मॅन पॉलिटिक्स’

Share

युती-महायुतीच्या पलिकडचा आमदार; अब्दुल सत्तारांचा स्वबळाचा राजकीय खेळ

मुंबई: मराठवाड्यातील राजकारणात एक असे आमदार आहेत, ज्यांच्यासाठी युती, महायुती किंवा आघाडीचे कोणतेही बंधन लागू होत नाही. राज्य पातळीवर पक्षाचे मोठे नेते जे निर्णय घेतील, त्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघाचा निर्णयच अंतिम मानणारे ते आमदार म्हणजे सिल्लोड-सोयगावचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असतानाही सत्तार यांनी नेहमीच स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी कोणतीही युती न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा पक्षातील कुठल्याही वरिष्ठ नेत्याला प्रचारालाही न बोलावता त्यांनी स्वतःच्या यंत्रणेतून पाचव्यांदा नगरपालिका एकहाती जिंकली. या निवडणुकीत त्यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षही बनवले.

आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पातळीवर भाजप-शिवसेना युतीच्या बैठका सुरू असतानाच अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात आपण स्वबळावरच लढणार असल्याची जाहीर घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीतील स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

शिवसेनेत येण्यापूर्वी अब्दुल सत्तार हे काँग्रेस पक्षात होते. काँग्रेसकडून आमदार, मंत्री आणि जिल्हाध्यक्षपद भूषवणाऱ्या सत्तार यांनी जिल्हा पातळीवर नेहमीच आपले वर्चस्व राखले. एखादा निर्णय मनाविरुद्ध गेला की बंड करण्याची त्यांची भूमिका अनेकदा पक्षासाठी डोकेदुखी ठरली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीला उघड विरोध करत त्यांनी अखेर पक्षालाच रामराम ठोकला होता. यानंतर भाजप प्रवेशाच्या हालचाली झाल्या, मात्र स्थानिक विरोधामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्यमंत्री केले. मात्र कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा अपूर्ण राहिल्याने नाराज सत्तार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, पण वादग्रस्त निर्णय आणि विधानांमुळे ते कायम चर्चेत राहिले.

सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर सत्तार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. तेव्हापासून नाराज असले तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडलेली नाही. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांनी मतदारसंघाव्यतिरिक्त संघटनात्मक कामातून पूर्णतः अंग काढून घेतल्याचे दिसते.

आता जिल्हा परिषदेसोबतच शेजारच्या कन्नड विधानसभा मतदारसंघातही वेगळा राजकीय प्रयोग करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. कन्नडच्या आमदार संजना जाधव यांनी नुकतीच सत्तार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

एकंदरीत, अब्दुल सत्तार हे कोणत्याही पक्षाच्या चौकटीत न बसणारे, पण मतदारसंघावर मजबूत पकड असलेले नेते म्हणून पुन्हा एकदा मराठवाड्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *