…जे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे : उद्धव ठाकरे

uddhav-thackeray
Share

मुंबईः बोगस आणि दुबार मतदारांचे सगळे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आता न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. मनसे आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत निवडणूक आयोगाच्या मतदारयादीतील भ्रष्टाचाराविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकांना जागृत राहण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही लोकशाही मार्गाने यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे हे जे काही चाललं आहे थांबवलं पाहिजे. आज एवढे सगळे धडधडीत पुरावे दाखवले, तरीही निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही. आपले पक्ष चोरले, नाव चोरले… तेवढंही पुरेसं नाही म्हणून आता मतदारही चोरले जात आहेत. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, आजही महाराष्ट्र एकवटला आहे. ज्या गोष्टी आता आम्ही विरोधी पक्ष करत आहोत, तसंच सगळ्या मतदारांनीही जागृत व्हावं आणि मतदार याद्या तपासा. आपलं नाव त्यामध्ये आहे की नाही हे तपासा आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर तुम्हाला माहिती नसलेले किती मतदार आहेत ते तपासा.’

उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा नावाने एक ऑनलाईन अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आला. घरातील मतदार रद्द करण्यासाठी त्याने अर्ज केला होता. तो अर्जही बोगस आणि मोबाईल नंबरही खोटा असल्याचे उघड झाले. त्यावर निवडणूक आयोगाने आमच्याकडे येऊन त्याची खातरजमा केली. माझ्या नावाने खोट्या नंबरने ओटीपी करण्याचा प्रयत्न केला गेला, तो 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. यामागे काही षडयंत्र आहे का हे तपासावे लागेल. या सगळ्याचे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणूक आयोग तर लाचार झालाच आहे, पण आता न्यायालय काय करतंय ते पाहू. न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे. आम्ही पुढे जात असताना तुमची साथ हवी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *