महायुती म्हणून लढावं हा आमचा प्रयत्न;आढावा बैठकीनंतर सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी साधला संवाद…
मुंबई: महायुतीतील सामंजस्य कसं टिकलं जाईल असा प्रयत्न राहणार असून नवाब मलिक हे आमच्या पक्षातंर्गत निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे महायुती म्हणून बोलणी आणि वाटाघाटी होत असतात त्यात राज्यपातळीवर नेते सहभागी असतात. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय आज किंवा उद्या होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पक्षातंर्गत मुंबईसह वेगवेगळ्या महानगरपालिकांचा आढावा घेतला. तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले.
मुंबई महानगरपालिकासहीत इतर महानगरपालिकेत महायुती होण्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याशी रात्री चर्चा करेन आणि पुन्हा याविषयावर चर्चा करुन पुढची पावले महायुतीच्या दृष्टीकोनातून करता येऊ शकते हा प्रयत्न असणार आहे असेही सुनिल तटकरे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.
अमित साटम काय म्हणाले यावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. या देशाचे नेते अमित शहा यांच्याजवळ प्रफुल पटेल व मी चर्चा केली आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माझी चर्चा झाली आहे. त्यानंतर दादा मी व प्रफुल पटेल आम्ही सखोल चर्चा केली असली तरी पुन्हा एकदा दादांशी चर्चा करुन मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने मुंबईसह सगळा विभाग माझ्या अखत्यारीत येतो हेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
महायुती म्हणून लढावं हा आमचा प्रयत्न राहिल त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच मी कालपासून मुंबईत आहे. शनिवारी यावर सकारात्मक चर्चा करु आणि अंतिम निर्णय जो होईल तो आपल्यासमोर ठेवू असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना सांगितले.