नवी दिल्लीः गांधी जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर) आज दिल्लीत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन विद्यार्थी संघटना, डावे पक्ष, युवक काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांनी पुकारले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना सतर्क करण्यात आले असून, भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. जंतर मंतर आणि कॅनॉट प्लेस परिसरात गर्दी करण्यास परवानगी दिली जाणार नाही. वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. याशिवाय, दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
जंतर मंतर येथील आंदोलनाची घोषणा झाल्यापासून दिल्ली पोलिसांनी शांतता राखण्यासाठी व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. नवी दिल्लीतील व्हीव्हीआयपी भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांसोबतच निमलष्करी दलांचे हजारो जवानही तैनात करण्यात आले आहेत.
दिल्ली पोलिसांनी पार्लमेंट स्ट्रीट उपविभागासाठी हा आदेश जारी केला आहे. कलम १६३ व्यतिरिक्त, नागरिकांना बॅनर आणि पोस्टर्स बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. घोषणाबाजी करण्यास आणि भाषणे देण्यासही परवानगी नाही. पोलिसांनी शस्त्रे, पोस्टर्स, बॅनर्स, काठ्या, भाले, तलवारी आणि दंडुके यांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्ली जिल्हा पोलिसांनी एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे, ज्यात म्हटले आहे की सार्वजनिक सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. परवानगीशिवाय सभा, भाषणे, घोषणाबाजी, मिरवणुका, निदर्शने, धरणे आणि इतर कोणत्याही उपक्रमांना मनाई आहे. पोलिसांनी नागरिकांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले असून, उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जाहीर केले आहे की, दिल्लीतील ११ मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. तथापि, राजीव चौक, मंडी हाऊस, नवी दिल्ली आणि सेंट्रल सेक्रेटरीएट स्थानकांवर इंटरचेंज सुविधा उपलब्ध असतील. या १२ स्थानकांमध्ये जनपथ, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट, राजीव चौक, सेवा तीर्थ, मंडी हाऊस, लोक कल्याण मार्ग, आयएनए, चावडी बाजार, रामकृष्ण आश्रम मार्ग आणि नवी दिल्ली यांचा समावेश आहे.