नवी मुंबई महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; उद्धव ठाकरे गटाचा सहकार्याचा सूर

Share

गणेश नाईक यांची राजकीय खेळी निर्णायक, संदीप नाईक सक्रिय

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेत १११ पैकी ६५ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली असून, या विजयामागे वनमंत्री गणेश नाईक यांची आक्रमक आणि रणनीतीपूर्ण भूमिका निर्णायक ठरली आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतील राजकारणात भाजपला थेट पाठिंबा न देता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सहकार्याची भूमिका घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

१४ गाव परिसरातून निवडून आलेले अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी यापूर्वीच भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाचे विशाल विचारे आणि विशाल ससाणे हे दोन नगरसेवक निवडून आले असून, सत्तेशी जुळवून घेण्याबाबत ‘मातोश्री’वरून सूचना देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिंदे गटाविरोधात नाईकांची ठाम भूमिका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती न करण्याची ठाम भूमिका गणेश नाईक यांनी घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाईक यांची ही भूमिका मान्य करत निवडणुकीची संपूर्ण सूत्रे त्यांच्याकडे सोपवली. नाईक यांनीही अत्यंत आक्रमकपणे ही निवडणूक लढवत शिंदे गटाला स्पष्ट राजकीय संदेश दिला.शिंदे यांनी नवी मुंबईत दोन रोड शो करत मतदानाच्या आदल्या रात्री शहरात तळ ठोकला होता. मात्र, संपूर्ण नाईक कुटुंबाने ताकदीने मैदानात उतरून भाजपचा विजय सुनिश्चित केला.

नाईक समर्थकांची महापालिकेवर पकड

भाजपचे ६५ नगरसेवक निवडून आले असून, सीवूड्सचे दीपक पवार यांचा अपवाद वगळता उर्वरित ६४ नगरसेवक हे गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक मानले जात आहेत. महापौरपदी सुजाता सुरज पाटील आणि उपमहापौरपदी दशरथ सिताराम भगत यांची निवड करून महापालिकेवरील आपली पकड नाईक यांनी अधिक मजबूत केली आहे.

दरम्यान, भाजप समर्थकांकडून उद्धव ठाकरे गटाचे दोन आणि एका अपक्ष अशा तीन नगरसेवकांना सोबत घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते. उद्धव सेनेकडून भाजपला थेट पाठिंबा दिला जाणार नसला, तरी प्रभागातील कामे आणि निधी वाटपात सहकार्याचे धोरण राबवले जाणार असल्याचे संकेत आहेत.

“मातोश्रीचा आदेश अंतिम”

यासंदर्भात वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक विशाल विचारे यांनी,“मातोश्रीवरून जो आदेश येईल, त्यानुसार आम्ही भूमिका घेऊ,”असे स्पष्ट केले.

संदीप नाईक सक्रिय

महापौर व उपमहापौर निवडणूक पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांचे पुत्र, माजी आमदार संदीप नाईक सक्रिय झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाच्या दोन्ही नगरसेवकांनी संदीप नाईक यांची भेट घेऊन पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा केल्याचे समजते. शिंदे गटाच्या नगरसेवकांसोबत विरोधी बाकांवर बसणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *