देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल : रोहित पवार

rohit-pawar
Share

पुणे : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू झाला आहे. अजितदादा असताना पुण्यात अशी गुन्हेगारी कधीच नव्हती, त्यामुळे पुण्याचे पालकत्व आता मुख्यमंत्र्यांनी घ्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर आमदार रोहित पवार यांनी विरुद्ध भूमिका मांडली. पुण्याचं पालकत्व जर मुख्यमंत्र्यांनी घेतलं तर पुण्याचं वाटोळं होईल असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसंच दादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, असेही रोहित पवार म्हणाले.

सध्याच्या पुण्याच्या पालकमंत्र्यांना अजितदादांसारखं काम करता येत नाही, असे रोहित पवार म्हणाले. पुण्याला जरा कठोर पालकमंत्री द्या, किंवा सुनेत्रा पवारांना ताकद द्या, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. दादांचा प्रशासनावर वचक होता, दरारा होता. त्यामुळे सुप्रिया सुळे म्हणतात त्याप्रमाणे अजितदादांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. सुनेत्रा पवारांना पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत, त्यांच्या राजकारणाची आता सुरुवात आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारांनी, खासदारांनी त्यांना मदत करावी, असे रोहित पवार म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुण्याचं पालकत्व हे देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवार म्हणाले की, “पुण्यातील घटना हे राज्याच्या गृहखात्याचं अपयश आहे. त्यामुळे एक पुणेकर म्हणून आमची मागणी आहे की, पुण्याचं पालकत्व हे मुख्यमंत्र्यांना देऊ नये. कारण ते स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्यांचं खातं गुन्हे रोखण्यात अपयशी ठरलं आहे. ते जर पुण्याचे पालकमंत्री झाले तर वाटोळं होईल. त्यामुळे सुनेत्रा पवारांनाच ताकद द्यावी. त्यांना जर काम करता येत नसेल तर एखादा कार्यक्षम व्यक्ती पालकमंत्री म्हणून द्यावा.”

पुण्याचे पोलीस आयुक्त हे कुणाचेही ऐकत नाहीत. ते फक्त देवेंद्र फडणवीसांचे ऐकतात. पोलीस आयुक्त हे कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचं, पुणेकराचं ऐकत नाहीत म्हणून शहराची ही अवस्था आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी एखादा कार्यक्षम अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

पुणे! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरे यांनाच घरचा आहेर…

चर्चांना उधाण! शरद पवार यांच्या निवृत्तीच्या बातमीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

One thought on “देवेंद्र फडणवीस यांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल : रोहित पवार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!