साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरण; राहुल गांधींनी पालकांची भेट घेऊन दिले मदतीचे आश्वासन

Share

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या पालकांशी संवाद साधला आणि आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले, असे पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. साहिलने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती.

राहुल गांधी वाशिमहून मुंबईकडे येत असताना, रवींद्र आणि सोनाली वाकोडे यांच्याशी व्हीडिओ कॉलद्वारे संवाद साधला. सुमारे १७ मिनिटांच्या या संभाषणादरम्यान, राहुल यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या कॉलदरम्यान साहिलच्या आईवडिलांसोबत इंडियन यूथ काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे हे देखील उपस्थित होते.

साहिलच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी व्हावी या मागणीसाठी आणि वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होत आहे. त्याच्या आईवडिलांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलाला आयआयटी मुंबईमध्ये जातीय भेदभावाला आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले आणि त्यांनी जबाबदार लोकांवर कारवाईची मागणी केली आहे.

आयआयटी मुंबईचा बी.टेकचा विद्यार्थी असलेला साहिल, १८ सप्टेंबरच्या संध्याकाळी त्याच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्यावर मध्य-सत्र परीक्षांदरम्यान चॅटजीपीटी वापरल्याचा आरोप होता.

परीक्षेदरम्यान घडलेली ही घटना या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आली, कारण एका प्राध्यापकाने साहिलला थांबवून परीक्षा हॉलमधून बाहेर काढले होते. बुधवारी काही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या हॉलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये, प्राध्यापकाकडे जाण्यापूर्वी आणि त्यांना बाहेर काढण्यापूर्वी साहिलच्या कृती दिसत होत्या. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या मृत्यूचा तपास करत आहे.

जातीय भेदभावाच्या आधारावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी, एफआयआरमध्ये नाव असलेल्या प्राध्यापक सूर्यनारायण दुला यांना रजेवर पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!