चर्चांना उधाण! राजगुरुनगरमध्ये नगरसेवक पदासाठी लिलाव किती कोटींचा पाहा…

political-leader
Share

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाच्या जागेसाठी चक्क लिलाव झाल्याची चर्चा आहे. एका प्रभागात पुरुषांच्या जागेसाठी 1 कोटी तीन लाखांची बोली लागली अन् महिलांच्या जागेसाठी 22 लाख रुपयांची बोली लागल्याची चर्चा राजगुरुनगरमध्ये जोरदार सुरु आहे. राजकीय वर्तुळात यावर चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यावर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही ही मूग गिळून गप्प आहेत. परिणामी, आपापसात साटेलोटे झाल्यानं, ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा आहे.

नगरसेवक पदाच्या जागेसाठी झालेल्या बोलीतील रकमेतून शहराचा विकास करायचा, असाही एकमुखी निर्णय झाल्याची चर्चा आहे. पण हे कोणत्या प्रभागात घडलं अन् ते उमेदवार कोण? याबाबतची वाच्यता कोणीचं करत नाही. आज बिनविरोध घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशात कोण-कोण माघार घेतं अन् जे माघार घेतात त्याचं प्रभागात ही बोली लागली का? याबाबत तर्क-वितर्क लावले जाणार हे उघड आहे.

नगरसेवक पदासाठी पाच लाखाच्या आसपास खर्चाची मर्यादा आहे, अशात जर पुरुषांच्या जागेसाठी 1 कोटी 3 लाख आणि महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागेल असेल तर सर्वसामान्य नागरिक निवडणूक लढवू शकेल का? राज्य निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार? कारण भविष्यात निवडणुकांमधील पदांसाठी असा लिलाव होऊ लागला तर ही नवी प्रथा पडण्याची भीती आहे. ही लाजिरवाणी प्रथा लोकशाहीची थट्टा उडवू शकते. त्यामुळे या चर्चेतील तथ्य आणि सत्यता तपासणे आता गरजेचं ठरले आहे.

दरम्यान, शिंदे शिवसेना पुर्ण ताकदीने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार, शिवसेना उबाठा आणि शिंदे गटाची शिवसेना असे चारही पक्षांची चौरंगी लढत होत आहे. यात शिंदे शिवसेनेत नुकतेच दाखल झालेल्या अतुल देशमुख व शिंदे सेनेच्या इतर नेत्यांनी डावपेच टाकत राजगुरुनगर नगरपरिषदेची पहिली जागा बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *