माहिती अधिकाराच्या उत्तराने उडाली मोठी खळबळ
पुणे, ता. १३ जुलै २०२६ (संतोष धायबर) : पुणे महानगरपालिकेच्या रेकॉर्ड व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. एका ज्येष्ठ महिलेच्या प्रकरणातील अतिशय संवेदनशील आणि मूळ कागदपत्रांची फाईल महापालिकेच्या मुख्य इमारतीतून गायब झाली असून, माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या उत्तरामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे.
पुणे शहरातील एका ज्येष्ठ महिलेने महत्त्वाची कागदपत्रे मिळविण्यासाठी ६ नोव्हेंबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत महानगर पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. अनेकदा फेऱ्याही मारल्या. परंतु, कोणतेही ठोस असे उत्तर मिळत नसल्यामुळे ज्येष्ठ महिलेला माहितीच्या अधिकाराचा आधार घ्यावा लागला. संबंधित कागदपत्रांची माहिती मागवली. मात्र, माहिती अधिकाराच्या उत्तरात “मूळ फाईल आढळत नसल्याचे” धक्कादायक कारण नमूद करण्यात आले आहे. संबंधित उत्तर पाहिल्यानंतर ज्येष्ठ महिलेला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे, नाना वाडा येथील महापालिकेच्या रेकॉर्ड रूममधील बारनिशीमध्ये स्पष्ट नोंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, मनपाचे शिपाई यांनी संबंधित फाईल हातोहात महापालिकेच्या मुख्य इमारतीत नेल्याची नोंद आहे. जर फाईल रेकॉर्ड रूममधून अधिकृतपणे मुख्य इमारतीत पोहोचली होती, तर ती नेमकी कशी आणि कुठे गायब झाली? फाईल हरवली की ती मुद्दामहून गहाळ केली? यामध्ये कोणाचा निष्काळजीपणा अथवा सहभाग आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुणे महापालिकेच्या रेकॉर्ड रूममधून महत्त्वाची फाईल गायब? https://t.co/DukiXlzy8S @PMCPune @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @supriya_sule @PuneCityPolice pic.twitter.com/9oAt6TCZYN
— mahabharat news (@mahabharatnewss) July 13, 2026
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित ज्येष्ठ महिलेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असून, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होतात की मुद्दामहून गायब केली जातात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय, उत्तर देण्यास टाळाटाळ का केली जात होती, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबतही या घटनेमुळे गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मूळ संवेदनशील कादगपत्रांची फाईल न मिळाल्यास ज्येष्ठ महिलेने उपोषणाचा इशारा दिला आहे.
– महापालिकेच्या रेकॉर्ड व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न.
– माहिती अधिकाराच्या उत्तरातूनच मूळ फाईल नसल्याची कबुली.
– रेकॉर्ड रूममधून फाईल बाहेर गेल्याची अधिकृत नोंद; तरी मुख्य इमारतीतून गायब.
– चार महिन्यांहून अधिक काळ ज्येष्ठ महिलेचा पाठपुरावा.
– नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी माहिती अधिकाराचाच आधार.
– फाईल हरवली की पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न? चौकशीची मागणी.
– ज्येष्ठ महिलेचा उपोषणाचा इशारा.