पुणे (संदिप कद्रे): श्री महारुद्र प्रतिष्ठान, वीरशैव लिंगायत समाज, गोकुळनगर यांच्या वतीने २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेला चार दिवसीय अनुष्ठान कार्यक्रम दिवाणजी सोसायटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सोहळ्यात श्री.ष.ब्र.१०८ गुरुवर्य अमृतेश्वर शिवाचार्य महाराज (जिंतूर) यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांनी दररोज सकाळी इष्टलिंग पूजा केली. सायंकाळी शिवपाठ, आशीर्वादवचन आणि धर्मसभा अशा आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोकुळनगर परिसरातील अनेक शिवभक्तांनी या मंगलमय वातावरणाचा लाभ घेतला. १ मार्च रोजी या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी डॉ. श्री.ष.ब्र.१०८ नीलकंठ शिवाचार्य महाराज (धारेश्वर), श्री.ष.ब्र. १०८ शिवानंद शिवाचार्य महाराज (वाळवा), श्री.ष.ब्र. १०८ महादेव शिवाचार्य महाराज (वाई), आणि श्री.ष.ब्र. १०८ प्रभुदेव शिवाचार्य महाराज (माढा) या गुरुवर्यांच्या दिव्य सानिध्यात सांगता सोहळा पार पडला.
या प्रसंगी नगरसेविका रंजनाताई टिळेकर, अर्चनाताई जगताप, पूजा तुषार कदम, वृक्षालीताई कामठे, प्रभाकर बाबा कदम व परिसरातील अनेक मान्यवर भाविकांनी शिवाचार्यांचे आशीर्वाद घेतले.
श्री महारुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश सोनेकर यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, “गोकुळनगर परिसरात लिंगायत समाजासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात. गोकुळनगर परिसरात वीरशैव लिंगायत समाजाची संख्या मोठी असूनही, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा किंवा शंकराचे मंदिर उपलब्ध नाही. समाजबांधव यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.” कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.