नाशिक : चांदवड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना शक्ती विलास ढोमसे यांनी मोबाईलवर संपर्क साधून पैशांच्या बदल्यात निश्चित मते मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. संबंधित ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांदवडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
अहिरे यांच्या म्हणण्यानुसार, ढोमसे यांनी संभाषणादरम्यान भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव बागुल यांना 13 हजार 642 मते मिळणार असल्याचा दावा केला. याबाबत विचारणा केल्यावर “ईव्हीएम मशीनवाल्याशी बोलणे झाले आहे” असे उत्तर दिल्याचा आरोप आहे. तसेच “एक कोटी रुपये दिल्यास तुला 11 हजार 250 मते मिळवून देऊ शकतो” अशी ऑफर देण्यात आल्याचा दावा उमेदवारांनी केला आहे.
संबंधित रेकॉर्डिंग व्हायरल होताच संबंधित बाबीची अधिकृत तक्रार चांदवड पोलिसांत दाखल करण्यात आली असून, हीच रेकॉर्डिंग व संबंधित पुरावे निवडणूक आयोगालाही सुपूर्द करण्यात आले आहेत. पोलिसांनी तक्रार स्वीकारून पुढील पडताळणी सुरू केली आहे. ऑडिओची सत्यता, कॉल डिटेल्स आणि संवादातील व्यक्तींची भूमिका याबाबत तपास सुरू करण्यात येणार आहे. मात्र, चांदवड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची क्लिप व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.