भारतीय लष्कराला मिळणार ७७० कोटी रुपयांच्या करारानुसार अत्याधुनिक रडार; शत्रूचे ड्रोन येणार अडचणीत…

Share

नवी दिल्ली: शत्रूच्या ड्रोनविरोधात भारतीय लष्कराची हवाई निगराणी आणि शोध क्षमता मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. लष्कराला ‘इम्प्रूव्हड लो लेव्हल लाईटवेट रडार’ (एलएलएलआर-आय) पुरवण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) सोबत ७७० कोटी रुपयांचा करार केला आहे.

हे प्रगत रडार लढाऊ विमाने आणि लहान ड्रोन या दोन्हींना शोधून, त्यांचा मागोवा घेण्यासाठी सक्षम आहे. आधुनिक युद्धात मानवरहित हवाई प्रणालींचा वापर झपाट्याने वाढत असताना, या खरेदीमुळे लष्कराची निगराणी क्षमता आणि हवाई धोक्यांना तोंड देण्याची सज्जता अधिक मजबूत होईल.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पीआयबी) एका प्रसिद्धीपत्रकानुसार, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत बुधवारी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे, की ‘एलएलएलआर-१ रडार’ लढाऊ विमानांच्या आकारापर्यंतची हवाई लक्ष्ये, तसेच मिनी आणि मायक्रो ड्रोन शोधू शकते. ही प्रणाली केवळ लक्ष्य ओळखणे आणि त्याचा मागोवा घेणे यापुरती मर्यादित नाही, तर तिच्यामध्ये हवाई लक्ष्यांना प्राधान्य देण्याची क्षमता देखील आहे. यामुळे विविध प्रकारच्या हवाई धोक्यांमध्ये लष्कराला महत्त्वपूर्ण लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते.

आधुनिक युद्धभूमीवर ड्रोन आणि कमी उंचीवरील हवाई उपकरणे एक मोठे आव्हान बनत आहेत. मानवरहित हवाई प्रणालींचा वापर पाळत ठेवणे, टेहळणी करणे आणि हल्ल्यांच्या कारवायांसाठी वाढत्या प्रमाणात केला जात आहे. त्यांचा लहान आकार आणि विविध पद्धतींमध्ये उड्डाण करण्याची क्षमता यामुळे पारंपरिक हवाई संरक्षण प्रणालींना त्यांना शोधणे आव्हानात्मक ठरू शकते. ‘एलएलएलआर-१ रडार’ची लक्ष्ये ओळखण्याची, त्यांचा मागोवा घेण्याची आणि त्यांना प्राधान्य देण्याची क्षमता लष्कराची परिस्थितीविषयक जागरूकता सुधारेल. म्हणजेच सभोवतालची परिस्थिती आणि संभाव्य धोके समजून घेण्याची क्षमता वाढवेल. यामुळे लष्कराला नव्याने उदभवणाऱ्या हवाई धोक्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास मदत होईल.

या करारामुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. संरक्षण मंत्रालयाने देशाच्या संरक्षण उद्योगासाठी, ज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) समावेश आहे, होणाऱ्या संभाव्य फायद्यांवर भर दिला आहे. ‘बीईएल’सोबतचा हा करार लष्कराची तांत्रिक क्षमता बळकट करण्याच्या आणि देशात संरक्षण उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!