नवी दिल्ली: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्सबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मंत्रालयाने बुधवारी एक सूचना जारी करून चॅनेल्सना दहशतवादविरोधी कारवायांचे थेट प्रक्षेपण टाळण्यास, हिंसक दृश्ये दाखवताना सावधगिरी बाळगण्यास आणि राष्ट्रविरोधी मजकूर प्रसारित न करण्यास सांगितले आहे. तसेच, जातीय सलोखा राखण्याचे आणि बातम्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व खासगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्सना विहित कायदेशीर नियम आणि कार्यक्रम संहितेचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईही केली जाऊ शकते, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
अनेक खासगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेल ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा, १९९५’ आणि ‘केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, १९९४’ अंतर्गत विहित केलेल्या कार्यक्रम संहितेचे पालन करत नाहीत. आंतर-विभागीय समितीच्या (आयडीसी) बैठकीत असेही उघड झाले की, अनेक चॅनेलवर एकाच विषयाशी संबंधित बातम्या आणि दृकश्राव्य कार्यक्रम दाखवले जात होते. सर्व खासगी चॅनेल्सना प्रसारणाशी संबंधित कायदेशीर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात यावा. समितीने असेही म्हटले आहे की, प्रसारणादरम्यान अयोग्य वर्तन किंवा भाषेचा वापर सामान्य मानला जाऊ नये, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या मार्गदर्शक सूचनेत दहशतवादविरोधी कारवायांचे थेट प्रक्षेपण, हिंसक दृश्ये, गुन्हेगारी वार्तांकन, नैसर्गिक आपत्ती, भारताच्या अचूक नकाशांचा वापर, जातीय सलोखा आणि लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख गोपनीय ठेवणे, यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, थेट वादविवाद आणि पॅनल चर्चांसह कोणत्याही कार्यक्रमांनी जातीय किंवा राष्ट्रविरोधी भावनांना प्रोत्साहन देऊ नये. वाहिन्यांना एआय आणि जनरेटिव्ह एआयच्या वापराबाबतही सावध करण्यात आले आहे. ग्राफिक्स आणि आभासी बातम्यांच्या सादरीकरणात एआय साधनांचा वापर केवळ सहाय्यक क्षमतेपुरता मर्यादित ठेवावा आणि बातम्यांची अचूकता, सत्यता व संवेदनशीलता यांच्याशी तडजोड करू नये, असे सांगण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, मंत्रालयाने संपादकीय आणि आशय-पुनरावलोकन प्रणाली बळकट करण्याचे, तसेच बातमी संकलन, संपादन, निर्मिती, प्रक्षेपण आणि प्रसारण यामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित जागरूकता आणि प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास १९९५ च्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असा इशारा मंत्रालयातर्फे देण्यात आला आहे.