मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज (23 जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार राजकीय भाष्य करत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात करणाऱ्या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व होते. विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.
बालपणीच्या आठवणींना उजाळा
भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. “शाळेला दांडी मारायची असेल, तर मी थेट बाळासाहेबांकडे जाऊन त्यांना मिठी मारायचो. माँ आली की ते म्हणायचे, जाऊ दे गं, एक दिवस शाळेत नाही गेला तर काय होतं?” अशी आठवण त्यांनी सांगितली.परिस्थितीमुळे बाळासाहेब आणि त्यांच्या वडिलांना सातवीतच शिक्षण सोडावे लागले, मात्र त्यांनी उभं केलेलं कर्तृत्व आजही अढळ आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ठाकरे नाव पुसण्याचा प्रयत्न – पण अपयशी
“ठाकरे नाव पुसायला अनेकजण प्रयत्न करत आहेत, पण ते नाव अजूनही पुसलं जात नाहीय. असं काय रसायन होतं आणि त्याचे आम्ही वारसदार आहोत, याचा मला अभिमान आहे,” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. “जे विरोधक स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाजतात, त्यावर मी काही करू शकत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
गद्दारी हा महाराष्ट्राचा शाप?
इतिहासाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, “गद्दारी हा काही आजचा विषय नाही. तो पूर्वापार चालत आलेला आहे. जेव्हा विजय अशक्य असतो, तेव्हा शत्रू गद्दारांची मदत घेतो. गद्दारी भगव्याशी झाली नसती, तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलला असता.” शिवसेना लवकरच 60 वर्षांची होत असल्याचे सांगत त्यांनी, “60 वर्षांचं झाड मोठं असतं. पण कुऱ्हाडीचे दांडे आपलेच असतात. दोन व्यापारी आपल्या मुळावर घाव घालण्यासाठी हे दांडे वापरत आहेत,” असा घणाघात केला.
पैशांच्या जोरावर सत्ता, पण मन विकत घेता येत नाही
मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणुकांमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. तुम्ही मत विकत घेऊ शकता, पण मन कसं विकत घेणार?” “ठाकरे म्हणजे कोण आहोत, शिवसेना म्हणजे काय हे आधी पुसून टाका आणि मग मुंबई-महाराष्ट्राचा विचार करा,” असे आव्हान त्यांनी दिले.
गुलामगिरी नाकारण्याचा ठाम निर्धार
भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत स्पष्ट शब्दांत सांगितले, “बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवलं. जर आपण ते विसरलो, तर पुन्हा गुलामगिरीत जगावं लागेल. मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम होऊन जगणार नाही,” असा थेट हल्लाबोल करत त्यांनी मोदी–शहा यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.