बारामती: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांत एकत्र लढूनही दारुण पराभव पत्करावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पराभवानंतर लगेचच हालचालींना वेग आला आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत एकत्रितपणे लढण्याबाबत यावेळी सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
१२ जिल्ह्यांत एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकीतील जनादेश आम्ही स्वीकारला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी गोविंदबागेत एकत्र आलो. ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या सुमारे १२ जिल्ह्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवतील. काही ठिकाणी मात्र स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते.
केंद्र व राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, या प्रश्नावर शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत ‘अजिबात नाही’ असे सांगितले. सध्याच्या निवडणुकांमध्ये विकासापेक्षा धार्मिक वाद, आर्थिक वाटप आणि सत्तेचा गैरवापर अधिक निर्णायक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
निर्णय योग्य वेळी, स्थानिक परिस्थितीनुसार; अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चांबाबत सावध आणि मोजकी भूमिका घेतली. ‘मी कृषक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी गोविंदबागेत आलो होतो. तेथे शरद पवार यांची भेट झाली आणि एकत्र उद्घाटन कार्यक्रम पार पडला. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आम्ही महायुतीत आहोत. पुढील निर्णय स्थानिक राजकीय समीकरणे, भौगोलिक परिस्थिती आणि पक्षांची ताकद पाहून योग्य वेळी घेतला जाईल,’ असे पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका पराभवावर बोलताना त्यांनी, ‘मतदारराजा सर्वांत महत्त्वाचा असतो. भाजपला यश मिळाले आहे, त्यांचे अभिनंदन. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करणे गरजेचे आहे. निकालाची कारणे लवकरच सविस्तरपणे समजून घेऊ,’ असे सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुका प्राधान्याच्या; सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महानगरपालिका निवडणुकीतील कौल लोकशाहीचा भाग आहे. त्यावर आत्मचिंतन आवश्यक आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र सध्या जिल्हा परिषद निवडणुका अधिक महत्त्वाच्या आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेत सक्षम, अनुभवी आणि जबाबदार लोक निवडून येणे अत्यंत गरजेचे आहे,’ असे त्या म्हणाल्या.
निकाल कमी-जास्त लागतात; जयंत पाटील
ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भाजपच्या महापालिका विजयाबद्दल अभिनंदन करत, ‘निवडणुकांचे निकाल कमी-जास्त लागत असतात. त्यातून बोध घेऊन अधिक वेगाने काम करणे आवश्यक आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली.