जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस प्रशासनावर आणि सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सावदा परिसरातील एका विधवा महिलेवर एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा खळबळजनक दावा खडसे यांनी केला आहे. या प्रकरणात पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांच्या मते, पीडित विधवा महिला सावदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. मात्र, तिथे असलेल्या पोलीस निरीक्षकाने या महिलेची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तिला धमकावून घरी पाठवून दिले. एका मोठ्या पदाधिकाऱ्याने विधवा महिलेवर बलात्कार करणे आणि पोलिसांनी अशा गंभीर गुन्ह्याची दखल न घेणे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, असे खडसे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी सावदा पोलीस स्टेशनच्या निरीक्षकावर थेट निशाणा साधला. या अधिकाऱ्याला राजकीय संरक्षण मिळत असून, गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मोठी हेराफेरी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
खडसे यांनी यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करत एक फोटो देखील प्रसारमाध्यमांना दाखवला. पोलीस अधिकारी कशा प्रकारे मंत्र्यांसोबतचे फोटो स्टेटसवर ठेवतात आणि त्यांना कशा प्रकारे संरक्षण दिले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. संबंधित पोलीस निरीक्षकाच्या कामकाजावर बोट ठेवताना खडसे म्हणाले की, हा अधिकारी केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही, तर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे काम करत आहे.
सावदा परिसरातील एका मोठ्या गावातील विधवा महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. तोही एका राजकीय पदाधिकाऱ्यानं केला आहे. ती महिला तक्रार द्यायला सावदा पोलीस ठाण्यात आली होती. ती सकाळी १२ ते ७ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात थांबली होती. तरीही तिची तक्रार घेतली नाही. तो पदाधिकारी मोठा राजकीय पदाधिकारी आहे. महिला विधवा आहे. तिची नोंद न घेणं, हा गंभीर गुन्हा आहे. तिची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी तिला धमकावून माघारी पाठवले. ही सगळी घटना पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे मी फुटेजची मागणी केली आहे. अजून फुटेज मिळाले नाहीत. पण ही माझी माहिती आहे. सात-सात तास पोलीस ठाण्यात ताटकळूनही बलात्कार पीडितेला न्याय मिळत नसेल तर ही गंभीर बाब आहे, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.