मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली असतानाच खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. अजितदादांनी एकदा छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जावं अशी इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट कोल्हे यांनी केला.
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येथे आयोजित व्याख्यानाला सुरुवातीला विरोध झाला होता. मात्र, अखेरीस कोल्हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपल्या शैलीत भाषण केलं. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर आणि पक्षातील घडामोडींवर भाष्य केलं.
पत्रकारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाल्याबाबत तसेच जयंत पाटील अर्थमंत्री होतील, अशा चर्चांबाबत प्रश्न विचारला असता, कोल्हे म्हणाले, “या संदर्भात मी अनेक वृत्तवाहिन्यांशी बोललो आहे. काही चर्चा झाल्याचं ऐकिवात आहे; मात्र त्याबाबत मला सविस्तर माहिती नाही. दादा आता नाहीत, त्याबद्दल अधिक काय बोलणार?”
भुजबळांबाबत अंतर्गत चर्चेचा उल्लेख
प्रदेशाध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद ठरल्याच्या चर्चेवरून छगन भुजबळ यांनी टोला लगावल्याच्या प्रश्नावर कोल्हे म्हणाले, “भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत. जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासारखा नेता संसदेत असणं महत्त्वाचं होतं. अजितदादांनी ओघात सांगितलं होतं की, भुजबळ साहेब राज्यसभेत जावेत अशी त्यांची इच्छा होती. सामाजिक प्रश्नांची जाण असलेला नेता न जाता, कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनीती आखणारी व्यक्ती राज्यसभेवर जाण्याची चर्चा होत असेल, तर त्यामुळे भुजबळ साहेब अस्वस्थ असू शकतात.”तसेच, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ यांच्याबाबत समोर आलेल्या व्हिडीओचा उल्लेख करत तो तपासावा, असंही कोल्हे यांनी सुचवलं.
अजितदादांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, अजितदादांच्या अपघाताबाबत सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक का केलं जात नाही, असा सवालही कोल्हे यांनी उपस्थित केला. “घटनेचं गांभीर्य लक्षात घेता, सीसीटीव्ही फुटेज देता येत नसेल तर संशय बळावतो. या प्रकरणात रोहित पवार यांनीही पाठपुरावा केला आहे. सत्य समोर आलं पाहिजे,” असं ते म्हणाले.
या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि विलीनीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी काळात या प्रकरणी पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.