दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी सोडले मौन…

aaditya-thackeray
Share

मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अखेर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव थेट समाविष्ट करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले असून या प्रकरणावर X माध्यमावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी नोंदवलेल्या जबाबात मात्र काही व्यक्तींवर गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या जबाबात आमदार आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पंचोली, दिनो मोरिया आणि इतर काही व्यक्तींचा संशयित आरोपी म्हणून उल्लेख केला असून, दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. आज अखेर आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले असून अफवांचा धुरळा उडवणं बंद करा अशा शब्दात विरोधकांना सुनावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो, मी दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या 6 वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.

अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या. परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे किंवा कोणाचाही स्पष्टपणे उल्लेख नाही. एफआयआरमधील आरोपीच्या स्तंभात अज्ञात व्यक्ती असाच स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेलाच एफआयआरमध्ये रुपांतरित करून सीबीआयने या प्रकरणाचा रीतसर तपास सुरू केला आहे सीबीआय आता या सर्व व्यक्तींचा या प्रकरणात खरोखरच काही सहभाग आहे का, याचा कसून तपास करणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट निर्देश दिले आहेत. जबाबात नावे आली असली तरी केवळ संशयावरून कोणतीही थेट कारवाई केली जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!