भाजपचा राज्यसभा डाव जाहीर; रामदास आठवले यांना पुन्हा संधी, चार उमेदवारांची घोषणा

Share

मुंबई: राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम देत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील चार जागांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. पब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यसभेचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चांना छेद देत भाजपने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत विनोद तावडे, रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. सामाजिक समतोल, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि पक्षनिष्ठा यांचा विचार करून ही निवड करण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना ही घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून एकूण सात जागा रिक्त असून भाजपकडे विधानसभेत १३२ आमदारांचे बळ असल्यामुळे पक्षाला तीन ते चार उमेदवार सहज निवडून आणण्याची शक्यता आहे. उमेदवार निश्चित करण्यापूर्वी केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील कोअर कमिटीच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर ही यादी दिल्लीला पाठवण्यात आली आणि अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, १६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रासह १० राज्यांतील ३७ जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली असून नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख ५ मार्च आहे.

भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी महाविकास आघाडीत मात्र अजूनही तळ्यात-मळ्यात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यसभेवर जाण्याबाबत सस्पेन्स कायम आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे शरद पवार राज्यसभेवर जाणार की त्यांच्या संसदीय कारकिर्दीला ब्रेक लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *