पंजाबच्या एसआयआर यादीत स्थलांतरित असल्याच्या नोंदीमुळे राघव चड्ढा आणि ‘आप’ आमनेसामने…

Share

नवी दिल्लीः पंजाबमधील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मतदार यादीत आपले नाव नसून, स्थलांतरित दाखविण्यात आल्यामुळे, पंजाबमधील सत्तारूढ आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे सदस्य राघव चड्ढा आणि ‘आप’च्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

‘एसआयआर’मधील नाव काढून टाकल्यामुळे राघव चड्ढा हे राज्यसभेतील आपली जागा गमावू शकतात, असे ‘आप’चे दिल्ली प्रदेश अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी सांगितले. ‘आप’च्या उमेदवारीवर २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून आलेल्या राघव चड्ढा यांनी, पक्षात मतभेद झाल्यामुळे गेल्या एप्रिलमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

पंजाबमधील ‘आप’ सरकारने आता सूडाचे राजकारण मतदार यादीपर्यंत नेले आहे, असा आरोप करून चड्ढा म्हणाले, की आपले मतदार ओळखपत्राची पंजाबमधील मोहाली येथे नोंदणी झालेली आहे. मात्र, तरीही मतदार यादीत आपले नाव स्थलांतरित म्हणून नोंदविण्यात आले आहे.

आपली पंजाबमधून राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेली असून, आपले मतदार ओळखपत्र पंजाबमधील मोहाली येथे नोंदणीकृत आहे. ते पुढे म्हणाले, की सुदैवाने ही अंतिम मतदार यादी नसून, मतदार यादीचा मसुदा आहे. ‘एसआयआर’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपलब्ध असलेल्या उपाययोजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत आधीपासून आहे. ही केवळ एक मानवी चूक वाटत नाही. हे राजकीय सूडबुद्धीचे स्पष्ट उदाहरण आहे.

राघव चड्ढा पंजाबमध्ये नव्हे, तर दिल्लीत राहात असल्याचे सर्वश्रृत आहे. जर ते आता पंजाबमध्ये राहत नसतील, तर त्यांची मतदार नोंदणी कायम ठेवणे किंवा तिचे हस्तांतरण करणे ही त्यांची स्वतःची जबाबदारी होती, असे ‘आप’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!