नवी दिल्ली: दिल्लीच्या अत्यंत वादग्रस्त दारू धोरणाशी संबंधित प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. दोघांनाही न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे.
न्यायालयाच्या निकालानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना केजरीवाल म्हणाले, आम्ही नेहमी सांगायचो सत्याचा विजय होतो. आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ज्या न्यायमूर्तींनी आमच्यासोबत न्याय केला त्यांचे धन्यवाद… सत्याचा विजय झाला, मी नेहमी सांगायचो भगवान आमच्यासोबत आहे. मोदीजी आणि अमित शही यांनी स्वतंत्र भारतातील सर्वात राजकीय षडयंत्र रचले. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी पक्षाच्या सर्वात मोठ्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकलं. विद्यमान मुख्यमंत्र्याला घरातून फरफटत नेऊन तुरुंगात टाकलं, सहा महिने आत ठेवलं गेलं. जे भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही. केजरीवाल भ्रष्ट नाही. मी माझ्या आयुष्यात इमानदारी कमावली. यांनी खोटी केस लावली, ते आज सिद्ध झालं. कोर्टानं म्हटलं केजरीवाल कट्टर इमानदार, मनीष सिसोदिया कट्टर इमानदार आहेत. आम आदमी पार्टी कट्टर इमानदार आहे. यावेळी केजरीवाल भावूक झाले आणि रडले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
निकालानंतर बोलताना त्यांनी आपल्या विरोधात पूर्णपणे खोटा गुन्हा तयार करण्यात आल्याचा आरोप केला. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मनिष सिसोदिया यांना सर्व आरोपांतून मुक्त केले आहे. ठोस आणि पुरेशा पुराव्यांशिवाय लावलेल्या आरोपांवर विश्वास ठेवता येत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले.
या प्रकरणात सर्वप्रथम आबकारी विभागाचे माजी आयुक्त कुलदिप सिंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यानंतर सिसोदिया आणि शेवटी केजरीवाल यांनाही दिलासा देण्यात आला. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने नमूद केले. काही महत्त्वाच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत पुरावे कमकुवत व अपुरे असल्यामुळे दिलासा देण्यात आल्याचे सांगितले.
संवैधानिक किंवा सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींवर गंभीर आरोप करताना ठोस पुरावे असणे अत्यावश्यक आहे. केवळ आरोप पुरेसे नसतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयाबाबत सीबीआयने असमाधान व्यक्त केले असून उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. आदेशाचा सविस्तर अभ्यास करून अपील दाखल करण्यात येईल, असे सीबीआयच्या वकिलांनी म्हटले आहे.