मुंबई : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. राजकीयृष्ट्या नाही तर एका विवाहसोहळ्याला दोघेही उपस्थित राहिले होते. लग्न सोहळ्यात दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने चर्चांना उधान आले आहे.
लग्न सोहळ्यात दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांच्या मुलीच्या लग्न समारंभाला उपस्थित होते. या विवाह सोहळ्यातील फोटो शरद पवार यांनी स्वत: सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन दिली. या फोटोमध्ये एका सोफ्यावर शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी बसलेले आहेत. तर, बाजुलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी शेअर केलेल्या या फोटोवर नेटीझन्स कमेंट करत आहेत. तुमच्या पोस्टमध्ये गौतम अदानींचा का उल्लेख केला नाही? असा सवाल कमेंट करुन विचारला जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसमवेत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मात्र, राजकीय विरोधक म्हणून ते सत्ताधारी व भाजपवर सातत्याने टीकाही करतात. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीक केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या मैदानातील निवडणुकीतवरुन त्यांचे कौतुकही केले होते. तर, गौतम अदानी यांच्याशीही शरद पवारांची जवळीक आहे.