महायुतीत तणाव वाढला; शिवसेनाला रायगडमध्ये सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती

Share

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

मुंबई: राज्यातील राजकारणात एकाच वेळी अनेक मोठ्या घडामोडींनी वेग घेतला आहे. रायगड जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवण्याची हालचाल सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड जाहीर झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर शिंदे गटानेही महत्त्वाचा निर्णय घेतला असून काँग्रेसमध्येही दोन बड्या नेत्यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

रायगडमध्ये शिंदे गट अडचणीत?

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत तणाव उफाळून आला आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना (शिंदे गट) सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील समन्वयातून जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे ठेवण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप न केल्यास शिंदे गटाला विरोधी बाकांवर बसावे लागू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. महायुतीत एकत्र असतानाही स्थानिक पातळीवरील मतभेद अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.

काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. चिमूरचे माजी आमदार अविनाश वारजूरकर आणि त्यांचे बंधू सतीश वारजूरकर यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षातील गटबाजीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दोन्ही नेत्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बळावली आहे. विदर्भातील दोन बड्या नेत्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची सूत्रे सुनेत्रा पवारांकडे

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर पक्ष नेतृत्वाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्या उर्जेने उभारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवारांच्या निधनानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट सतर्क झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढे ‘व्हीआरएस’ कंपनीच्या विमान आणि हेलिकॉप्टर सेवांचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित कंपनीच्या सुरक्षा मानकांबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आमदारांनी ही मागणी केली होती.

हिंदी सक्तीवरून विधानसभेत खडाजंगी

राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुरावे सादर करत हिंदीसंदर्भातील निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातच प्रक्रियेत आला होता, असा दावा केला.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर २१ सप्टेंबर २०२० रोजी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती आणि १४ सप्टेंबर २०२१ रोजी १०१ पानी अहवाल सादर करण्यात आला होता, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यातील या सर्व घडामोडींमुळे महायुतीतील समीकरणे, राष्ट्रवादीचे भवितव्य आणि काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण यावर पुढील काही दिवसांत मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *