नागपूर: कोणत्याही मंत्र्याची बायको सर्वांत जास्त ट्रोल होते. गरब्यामध्ये लव्ह जिहाद सारखा प्रकार होऊ नये, यासाठी मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको, अशी मागणी होत आहे. आपल्या धर्मात वेगवेगळे रंग आहे. जगात ख्रिस्ती धर्म पाळणाऱ्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. ते लोक सर्वधर्मियांचा समावेश आपल्या उत्सवांत करतात. ख्रिस्ती धर्मातील नववर्षाचे स्वागत जगात सर्वच ठिकाणी करण्यात येते. हिंदू धर्मानेही त्याचे अनुकरण केले पाहिजे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी येथे केले.
आपल्याकडे दहीहंडी, नवरात्र, गरबा यांसारखे खूप चांगले सण आहेत. कोणत्याही धर्माची व्यक्ती जर श्रद्धेने या उत्सवांत सहभागी होत असेल आणि अडचणी निर्माण करत नसेल, आपल्या कुटुंबासोबत विश्वासाचा टिळा लावून येत असेल तर त्याला येऊ द्यावे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर सातत्याने होणाऱ्या ट्रोलिंगवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, सर्वाधिक ट्रोलिंग आपल्यावरच होत आहे, असेही त्या म्हणाल्या.
नागपूरमध्ये आयोजित दहीहंडी महोत्सवाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मुन्ना यादव यांनी दहीहंडीचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ठिकाणी पुरुषांच्या जोडीला महिला गोविंदाही सहभागी होतात.
लव जिहाद यासारखी काही कारणे असतील. पण याचा आपल्याला दीर्घ विचार करावा लागेल. कायदे कठोर करावे लागतील. आपल्या मुलींना वेद, पुराण, महाभारत यांची माहिती आहे का? स्वतःच्या धर्मावर त्यांचा विश्वास आहे का? त्यांना स्वतःचा धर्मावर गर्व आहे का? जर असेल, तर अशा घटना कमी होतील किंवा हळूहळू कमी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांच्याबाबात अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी जरांगे पाटील हे आपले बंधू आहेत. त्यांना आपण घरी जेवायला यायचे निमंत्रण देणार आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या प्रतिक्रियांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.