मुंबई: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नगर परिषद, नगर पंचायतीनंतर महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या ५ फेब्रुवारीला मतदान, तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, निवडणुकांपूर्वीच राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कणकवलीत मोठा राजकीय धक्का दिला आहे.
याआधी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने त्याचा फायदा भाजप व शिवसेना शिंदे गटाला झाला होता. यावर ठाकरे गटाकडून आक्षेपही नोंदवण्यात आला होता. आता हाच प्रकार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही दिसून येत आहे.
कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समिती मतदारसंघात भाजपचे सोनू सावंत हे बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधीर सावंत तसेच मनसेचे उमेदवार शांताराम साद्ये यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला.
विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा हा तिसरा उमेदवार बिनविरोध विजयी ठरला असून भाजपची बिनविरोध विजयाची मालिका कायम राहिली आहे. पालकमंत्री नितेश राणेंच्या जिल्ह्यात मिळालेल्या या यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.