नवी दिल्ली: मी राजकारणात प्रवेश करू नये असे माझी मुले राहुल आणि प्रियांका यांचे मत होते. त्यांनी यासंदर्भात माझ्याशी चर्चाही केली होती असे काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. त्यांना मला गमवायचे नव्हते असेही त्या म्हणाल्या.
सोनिया गांधी यांनी ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात काँग्रेस पक्ष कठीण परिस्थितीतून जात असताना, पती राजीव गांधी आणि सासूबाई इंदिरा गांधी यांची छायाचित्रे पाहताना आपल्याला वेदना आणि अपराधीपणाची भावना एकाच वेळी जाणवत असे. मी स्वतःशीच संघर्ष करत होते. राजकारणाचे जग, त्यातील महत्त्वाकांक्षा आणि लोभ, ढोंगीपणा आणि सत्तेच्या खेळासोबत अपरिहार्यपणे येणारी विश्वासघाताची वृत्ती याबद्दल मला तिटकारा होता.
View this post on Instagram
आणीबाणीच्या संदर्भातही सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. त्याबाबत त्यांनी सांगितले की, आणीबाणी लागू झाल्यानंतर नेमके काय घडत होते, याची खरी तीव्रता आपल्याला नंतर समजली. त्या काळात लोकशाही अधिकारांवर मर्यादा आणण्यात आल्या. बंदी प्रत्यक्षीकरणाचा अधिकारही निलंबित करण्यात आला. मात्र, हे घटनात्मक प्रक्रियेनुसार करण्यात आले होते. देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय ही चूक होती. माझ्या सासूबाई व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही याची जाणीव झाली होती, त्या मनाने लोकशाहीवादी होत्या असे आपल्याला वाटते, असे सोनिया गांधी यांनी म्हटले.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झालेल्या दिवशीच राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास सांगण्यात आले होते. ही बातमी राजीव यांनी आपल्याला सांगितली, तेव्हा माझ्या हृदयात जणू कुणीतरी सुरा खुपसल्याची भावना झाल्याचे सोनिया गांधी यांनी मुलाखतीत म्हटले. राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यास त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होईल, असे आपल्याला वाटत होते असे सोनिया यांनी सांगितले. त्यासाठीच त्यांना हा निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली होती, असेही त्या म्हणाल्या.
कर्तव्याची जाणीव आणि मनातील भीती यांच्यात होणाऱ्या संघर्षामुळे व्यथित झाल्याने मी भगवद्गीतेचा आधार घेतला, असेही सोनिया यांनी मुलाखतीत सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता आपले धर्माचरण करा’ असे भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितले आहे. त्यातून माझ्या मनातील शंका आणि प्रश्नांची उत्तरे मला मिळाली होती. मी कर्तव्याला महत्त्व दिले.
सोनिया यांचे आत्मचरित्र म्हणजे राजकीय वक्तव्यांचा भरणा व अप्रामाणिक हेतूने केलेल्या दाव्यांचे संकलन आहे. गेल्या १२ वर्षांत भारताने केलेली सर्वांगीण प्रगती पाहण्यासाठी आधी डोळ्यांवरून ‘इटालियन चष्मा’ उतरवावा, अशी टीका भाजपने काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर शनिवारी केली. काँग्रेसच्या सत्ताकाळातील विविध घोटाळे, 1984 मधील शीखविरोधी दंगली आणि भोपाळ वायू दुर्घटनेबाबतही सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात लिहावे, असे आव्हान भाजपचे नेते तरुण चुघ यांनी दिले.
सोनिया गांधींचे ‘बिलाँगिंग’ पुस्तक छापण्यास पेंग्विन प्रकाशनाचा नकार