जगातील सर्वांत मोठ्या एनव्हीडिया चिप कंपनीत चिनी महिला हेराचा चंचूप्रवेश

Share

न्यूयॉर्कः जगातील सर्वांत मोठी चिप उत्पादक कंपनी एनव्हिडियाचे सीईओ जेन्सन हुआंग यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे, अमेरिकेत खळबळ उडाली आहे. हुआंग यांचे ज्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते, ती चिनी गुप्तहेर असल्याचा संशय आहे.

४.५ ट्रिलियन डॉलर्सच्या एनव्हिडिया कंपनीच्या संचालक मंडळाने एका चिनी व्यावसायिक महिलेसोबतच्या त्याच्या कथित जवळच्या संबंधांची चौकशी सुरू केल्यानंतर हे खुलासे समोर आले आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने गेल्या महिन्यात वृत्त दिले होते की जेन्सन हुआंगचे ॲलिस हुआंगसोबत संबंध होते, हा दावा जेन्सनने मान्य केला आहे. ॲलिस हुआंग ही सिंगापूरस्थित मेगास्पीड कंपनीची माजी कार्यकारी अधिकारी होती. अमेरिकी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात असे उघड झाले की तिचे चिनी गुप्तचर यंत्रणेशी संबंध होते.

अॅलिस हुआंग आणि जेन्सन हुआंग यांची पहिली भेट केव्हा आणि कशी झाली हे अजूनही अस्पष्ट आहे. तथापि, काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, जून २०२४ मध्ये ते तैपेईमधील एका बारमध्ये गिगाबाईट आणि नेटथंडरच्या अधिकाऱ्यांसोबत मद्यपान करताना एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले होते. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, त्याच काळात अॅलिस हुआंगच्या ‘मेगास्पीड’ या कंपनीने अब्जावधी डॉलर्स किमतीचे अत्याधुनिक ‘एआय मायक्रोचिप्स’ खरेदी करण्याचा करार केला होता.

मे २०२५ मध्ये, तैपेईमधील एका रेस्टॉरंटबाहेर पत्रकारांशी बोलत असताना ‘एनव्हिडिया’च्या सीईओच्या मागे अॅलिस हुआंग उभी असलेली दिसली होती. यानंतर, मेगास्पीड आणि एनव्हिडिया यांच्यातील व्यवहारांबद्दल वॉशिंग्टन (अमेरिकन सरकार) ची चिंता वाढली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात असे उघड झाले की, मेगास्पीडचा प्रमुख बीजिंगला माहिती पुरवत होता.

‘द टाइम्स’ आणि ‘फायनान्शिअल टाइम्स’मधील वृत्तांनुसार, एका गोपनीय मेमोमधून असे उघड झाले आहे की, चीनच्या राज्य सुरक्षा मंत्रालयाने ‘एनव्हिडिया’च्या प्रमुखाविषयी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी आणि कंपनीवर तिच्या सर्वांत प्रगत चिप्स चीनला विकण्यासाठी दबाव टाकण्याकरिता ॲलिस हुआंग यांना नियुक्त केले होते.

‘एआय’च्या स्पर्धेदरम्यान, जो बायडेन प्रशासनाने ‘एनव्हिडिया’ला चीनला उच्च-श्रेणीच्या चिप्स विकण्यावर बंदी घातली. तथापि, डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर, ‘एनव्हिडिया’च्या सीईओने चीनला होणाऱ्या चिप निर्यातीवरील कठोर नियमांना विरोध केला.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या हॅलोविन पार्टीमध्ये ‘एनव्हिडिया’च्या सीईओच्या प्रेमप्रकरणावर भाष्य केले. त्यांनी या परिस्थितीला अत्यंत गुंतागुंतीची म्हटले आणि जेन्सन हुआंग यांच्यासोबत सर्व काही ठीक होईल अशी आशा व्यक्त केली. हुआंग हे अध्यक्षांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. ट्रम्प यांनी हुआंग यांचे वर्णन हुशार आणि अद्भुत असे केले आणि त्यांना आपल्या परदेश दौऱ्यांवर सोबत नेण्याचा आग्रह धरला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!