नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासारखे भित्रे आणि लोभी नेते बाहेर पडल्यानंतर, काँग्रेसमध्ये आता केवळ सिंह उरले आहेत, असे तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी येथे सांगितले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीमाम्यासाठी दिल्लीत नुकत्याच झालेल्या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेल्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांशी, राहुल गांधी यांनी अनौपचारिक संवाद साधला. राजकारणातील मैत्री आणि शत्रुत्वाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनही त्यांनी स्पष्ट केला.
आझाद आणि शिंदे यांच्यासारखे जे लोभी किंवा भित्रे होते, त्यांनी एकतर सुविधा आणि सुरक्षिततेच्या लालसेपोटी किंवा अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांच्या भीतीने पक्ष सोडला होता. शिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी आपले कधीही मित्रत्त्वाचे संबंध नव्हते, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राहुल गांधी म्हणाले, की आपण एक राजकीय व्यक्ती आहोत. जो मित्र वाटतो तो प्रत्यक्षात तसा असेलच असे नाही आणि जो शत्रू वाटतो तो खरोखरच शत्रू असेलच असे नाही. ‘आपले खरे मित्र कोण आहेत हे ओळखणे तुमच्यासाठी खूप अवघड आहे’, असे ते मल्लिकार्जुन खर्गे यांना उद्देशून म्हणाले.
राहुल गांधींनी युवक काँग्रेस, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) आणि सेवा दलाच्या सुमारे ६० कार्यकर्त्यांना पक्षाच्या मुख्यालयात चहासाठी आमंत्रित केले होते. आंदोलने आणि संघर्ष हे त्यांच्या राजकीय प्रशिक्षणाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगून, त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांचे कार्य चालू ठेवण्यास प्रोत्साहन दिले.
त्यांनी तरुण कामगारांना आंदोलनाचे नवीन आणि सर्जनशील मार्ग शोधण्याचे आवाहन केले. त्यांनी जंतर मंतर येथे निदर्शन घेण्याचाही सल्ला दिला. तथापि, जंतर मंतर आता सरकारने परवानगी असलेल्या आंदोलन स्थळांच्या यादीतून काढून टाकले आहे.
नरेंद्र मोदी सरकारकडे केवळ आठ ते दहा महिने शिल्लक आहेत, असा दावाही राहुल गांधी यांनी या अनौपचारिक बैठकीत केला.