नवी दिल्ली: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींच्या जागतिक शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक शांततेसाठी सर्वांत विश्वासार्ह आवाज बनला आहे. हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे सांगितले.
ते म्हणाले की, पुतीन यांचे हे वक्तव्य महात्मा गांधी जयंतीनिमित्त आले आहे. नरेंद्र मोदी हे जागतिक शांतता आणि अहिंसेचे दूत आहेत. युद्ध, तणाव आणि अस्थिरतेच्या या काळात मोदीजींनी संपूर्ण जगाला हा संदेश दिला आहे की, तोडगा रणांगणावर नाही, तर संवाद आणि मुत्सद्देगिरीतून निघतो.
ते म्हणाले, ‘जागतिक संघर्ष असो वा कोणतीही आपत्ती, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत मदतीसाठी नेहमीच पुढे राहिला आहे आणि याच कारणामुळे आपल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ परंपरेला आज जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे.’
शाह म्हणाले, की याच कारणांमुळे आज जगातील कोणत्याही संकटाच्या वेळी भारताची भूमिका महत्त्वाची असते आणि संपूर्ण जग पंतप्रधानांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकते. पुतीन म्हणाले की, युक्रेन संघर्षावर परस्पर सामंजस्यपूर्ण तोडगा काढण्याबाबत मोदींकडे अतिशय चांगल्या कल्पना आहेत आणि ते प्रत्येक बैठकीत हा मुद्दा उपस्थित करतात.
वाल्दाई आंतरराष्ट्रीय चर्चा क्लबच्या वार्षिक बैठकीत बोलताना पुतीन म्हणाले, की युद्ध संपवण्याबाबत पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबद्दल आपण असे म्हणू शकतो, की मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध असूनही, ते अशा जागतिक नेत्यांपैकी एक आहेत जे सातत्याने हा मुद्दा उपस्थित करतात आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्याची मागणी करतात, असे ‘तास’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
ते म्हणाले की, मोदी आमच्या प्रत्येक बैठकीत हे मुद्दे उपस्थित करतात आणि त्यांना त्यात खूप रस आहे. परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे खूप चांगल्या कल्पना आहेत.