पुणे (संतोष धायबर) : पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचा अजब कारभार सोमवार पेठेतील ‘अशोक रेस्टॉरंट अॅण्ड बार’वरील कारवाईच्या निमित्ताने समोर आला आहे. महापालिकेने हॉटेल व्यवस्थापनाला ४८ तासांची मुदत देऊन नोटीस बजावली, मात्र नोटीस दिल्यानंतरच महापालिकेला सुट्ट्या असल्याने उत्तर देण्याची प्रक्रिया कशी पार पाडायची, असा प्रश्न निर्माण झाला. त्यातच मुदत संपण्यापूर्वीच महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी थेट दाखल झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. या प्रकारामुळे ‘महापालिकेला उत्तर द्यायचे कुठे आणि कधी?’ असा थेट सवाल उपस्थित झाला आहे.
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षक सुधील संकपाळ आणि प्रभारी महापालिका सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस काढण्यात आल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने सांगितले. नोटिसीत पत्र्याच्या धुराडा-चिमणीचे काम आणि नामफलक काढून टाकण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
नोटीस गुरुवारी; कारवाई शनिवारी!
हॉटेल व्यवस्थापनाच्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १७) सायंकाळी ५.४५ वाजता नोटीस देण्यात आली आणि त्यामध्ये ४८ तासांची मुदत देण्यात आली. मात्र, त्यानंतर शुक्रवारी (ता. १८) आणि शनिवारी (ता. १९) महापालिकेला सुट्टी होती. सुट्टी असतानाही शनिवारी सायंकाळी ५.४५ नंतर महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी थेट हॉटेलमध्ये घुसले होते, असा दावा हॉटेलच्या व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला आहे की, ४८ तासांची मुदत दिली होती, तर ती पूर्ण होण्यापूर्वी कारवाई करण्याची घाई का?
‘उत्तर द्यायचे तरी कुठे?’
नोटीसला उत्तर देण्याची संधी मिळण्यापूर्वीच अधिकारी कारवाईसाठी आले. महापालिकेच्या कार्यालयाला सलग सुट्ट्या असताना नोटिसीला उत्तर देण्याची प्रक्रिया नेमकी कशी पार पाडायची, कार्यालय बंद असेल तर नोटीस द्यायची कोणाकडे? याच मुद्द्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अखेर कारवाई थांबविण्यात आली. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही महापालिकेकडून एकतर्फी कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप हॉटेलच्या मालकीन लिला शेट्टी (वय ८०) यांनी केला आहे. प्रकरण न्यायालयात असताना आणि नोटिसीला उत्तर देण्याची मुदत असतानाही कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मागणार आहे,’ असे शेट्टी यांनी सांगितले.
१९६७ पासून व्यवसाय; तरीही वारंवार नोटिसा
‘अशोक रेस्टॉरंट अॅण्ड बार’ सन १९६७ पासून सुरू असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. महापालिकेचे नियमितपणे व्यावसायिक कर भरले जात असून, नियमांचे पालन केले जात असतानाही सातत्याने नोटिसा बजावल्या जात असल्याचा त्यांचा दावा आहे. महापालिकेच्या नोटिसीत अनधिकृत व बेकायदेशीर पत्र्याच्या धुराडा-चिमणीचे काम तसेच नामफलक त्वरित काढून टाकण्याचे निर्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, संबंधित चिमणी आमच्या मालकीच्या जागेत आहे. तसेच कोणतेही आकाशचिन्ह लावलेले नसतानाही नामफलकाबाबत एकतर्फी कारवाई केली जात असल्याचा आरोप लिला शेट्टी यांनी केला आहे.
‘यामागे मोठे गौडबंगाल’
‘नोटिसीला उत्तर देण्याची संधी न देता हुकूमशाही पद्धतीने कारवाई केली जात आहे. यामागे नेमके काय कारण आहे, याची चौकशी झाली पाहिजे. महापालिकेकडे तसेच न्यायालयात आम्ही दाद मागणार आहोत,’ असे शेट्टी यांनी म्हटले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महापालिकेच्या कारवाईवर चार थेट सवाल
१. गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजता नोटीस देऊन ४८ तासांची मुदत दिली असेल, तर मुदत पूर्ण होण्यापूर्वी कारवाई का?
२. नोटीस दिल्यानंतर सलग सुट्ट्या असताना संबंधित व्यक्तीने उत्तर द्यायचे कुठे?
३. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले जात असताना एकतर्फी कारवाईचा निर्णय कोणत्या आधारावर?
४. नोटिसीला उत्तर देण्याची संधी न देता प्रत्यक्ष कारवाई करण्याची एवढी घाई कशासाठी?
आता महापालिका काय उत्तर देणार?
अशोक रेस्टॉरंटवरील कारवाईच्या निमित्ताने महापालिकेच्या नोटीस प्रक्रियेवर आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नोटीस देण्याची वेळ, ४८ तासांची मुदत, त्यानंतरच्या सुट्ट्या आणि मुदत संपण्यापूर्वी झाल्याचा आरोप असलेली कारवाई या सर्व बाबींवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकृत स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. ‘४८ तासांची मुदत दिली, पण उत्तर देण्याची संधी मिळाली कधी?’ हा सवाल आता या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
@PMCPune @navalMH @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra pic.twitter.com/Chiw3CSSOB
— mahabharat news (@mahabharatnewss) September 24, 2026
पुणे महापालिकेतून फाईल ‘गायब’ होण्याचा फटका हॉटेल मालकाला; २० कुटुंबांवर उपासमारीची वेळ…
One thought on “पुणे महापालिकेच्या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकाऱ्यांचा अजब कारभार!”