पुणे शहरात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे’ मानकरी ठरले भाजपचेच नेते…

pmc
Share

पुणे : शहर विद्रुपीकरणाविरोधातील मोहिमेअंतर्गत पुणे महापालिकेने 24 नोव्हेंबर रोजी अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांविरोधात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी महापालिकेने ‘bhauflexkadha.pmc.gov.in’ हे संकेतस्थळ सुरू केले असून, या पोर्टलवर नागरिक अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र काढून अपलोड करू शकतात. सर्वाधिक फ्लेक्स ज्यांचे आढळतील, त्यांचे नाव आणि छायाचित्र 24 तासांत संकेतस्थळावर ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे’ मानकरी म्हणून प्रसिद्ध केले जाणार आहे. पहिल्या पुरस्काराचे मानकरी भाजपचे पदाधिकारी ठरले असून, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांची नावे यामध्ये समाविष्ट आहेत. तर व्यावसायिक/ब्रँड्स गटामध्ये ब्रम्हप्रिया वर्ल्ड स्कूल, आर जीज बिर्याणी आणि शांतिप्रिया/शांती शिखर यांची नावे जाहीर झाली आहेत.

पुणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे दावे करणाऱ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाच आता अनधिकृत फ्लेक्सच्या माध्यमातून पुणेकरांनी आरसा दाखवला आहे. पुणे महापालिकेच्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेला पहिल्याच दिवशी नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असून, तब्बल 150 हून अधिक तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या तक्रारींमध्ये सर्वाधिक निशाणा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जाहिरात फलकांवर साधण्यात आला आहे. त्यामुळे शहर विद्रुपीकरणाच्या मुद्द्यावर भाजपचीच कोंडी झाल्याचे चित्र आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

वाढदिवस, नियुक्त्या, स्वागत, सत्कार आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरातील चौक, रस्ते, पदपथ, झाडे आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स लावण्याची स्पर्धाच राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असते. विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स शहराच्या कानाकोपऱ्यात झळकत असतात. यामुळे पुण्याच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असून, नागरिकांकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा होत असल्याची टीकाही होत होती.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही मोहीम सुरू करून नागरिकांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवर अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र अपलोड करून तक्रार नोंदवता येते. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 150 पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्याने पुणेकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. या मोहिमेतील तक्रारींच्या अनुषंगाने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या फ्लेक्सची चर्चा रंगली आहे. पहिल्या दिवशी शहरात सर्वात अधिक जाहिरात फलक लावण्याचा मान स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मिळवला आहे. ‘शहर विद्रुपीकरण पुरस्कार 2026’ हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भिमाले यांनी पटकावला आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले भिमाले यांचे संपूर्ण शहरात जाहिरात फलक आढळल्याने ते पुरस्कारात ‘साहेब’ ठरले आहेत. त्यांच्या पाठोपाठ कोथरूड भागातील भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांचे प्रत्येक चौकात फलक आढळल्याने ते ‘दादा’ झाले आहेत. तर गल्लीत सर्वात अधिक फलकांमध्ये सुनील पांडे हे ‘भाऊ’ ठरले आहेत.

ब्रँड्स गटामध्ये ‘शहर विद्रुपीकरण पुरस्कार 2026’ मध्ये ब्रम्हप्रिया वर्ल्ड स्कूल यांना पहिला क्रमांक मिळाला असून, संपूर्ण शहरात त्यांच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर ‘आर जी बिर्याणी स्टोरी’ यांना क्रमांक देण्यात आला असून, चौकातील जाहिरातींसाठी त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर तिसरा क्रमांक ‘शांती शिखर’ यांचा आला असून, शहरातील अनेक भागांतील भिंतींवर जाहिराती लावल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून शहराच्या विकासाचे आणि स्वच्छतेचे दावे केले जात असताना, त्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स सार्वजनिक ठिकाणी झळकत असल्याचे चित्र या मोहिमेमुळे चर्चेत आले आहे. आता प्रशासन या तक्रारींवर किती निष्पक्षपणे कारवाई करते, संबंधितांकडून दंड वसूल करते का आणि राजकीय दबावाला बळी न पडता फ्लेक्स हटवते का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी दाखवलेला उत्साह कायम ठेवून महापालिकेने कारवाईतही तितकीच तत्परता दाखवली, तरच ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरणार आहे.

पुणे महापालिकेच्या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकाऱ्यांचा अजब कारभार!

पुणे महापालिकेच्या रेकॉर्ड रूममधून महत्त्वाची फाईल गायब?

बातमीची तत्काळ दखल! पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील कुंड्यांना मिळाले ‘जीवदान’

One thought on “पुणे शहरात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिम; ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे’ मानकरी ठरले भाजपचेच नेते…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!