नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, ३० ऑगस्ट) ‘मन की बात’च्या १३७ व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. सकाळी प्रसारित झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी देशातील विविध सामाजिक उपक्रम, युवक, राष्ट्रभक्ती, इतिहास आणि नशामुक्ती यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ मोहिमेचा विशेष उल्लेख केला. ही मोहीम देशभर वेगाने पुढे जात असून, मोठ्या संख्येने तरुण जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नशेची सवय केवळ संबंधित व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंब आणि समाजावर होतो. अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांचे त्यांनी कौतुक केले. तरुणांनी अंमली पदार्थविरोधी संदेश देणारी गाणी, नाटके आणि इतर सर्जनशील उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी तरुणांच्या ऊर्जेचा योग्य दिशेने वापर करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांनी नव्या कल्पना, कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे. नशामुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केवळ सरकारच नव्हे, तर प्रत्येक कुटुंब आणि समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
ऑगस्ट महिन्यात देशभर दिसणाऱ्या राष्ट्रभक्तीच्या वातावरणाचा उल्लेख करताना मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची चर्चा केली. यंदा ८ कोटींपेक्षा जास्त तिरंगा सेल्फी समाजमाध्यमांवर टाकण्यात आले होते. त्याचबरोबर ‘सूर्यपथ तिरंगा’ या अनोख्या उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. या माध्यमातून तिरंगा जगभराच्या प्रवासावर निघाला असून, फिजीची राजधानी सुवामध्ये सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आल्याचे मोदींनी सांगितले.
‘मन की बात’मध्ये मोदींनी भारताच्या इतिहासाशी संबंधित एका अनोख्या वेबसाइटचाही उल्लेख केला. मुंबईतील कृष्णा शेषाद्री यांनी तयार केलेल्या ‘भारतराज्य डॉट कॉम’ या वेबसाइटवर एखादे वर्ष निवडल्यानंतर, त्या काळात भारताच्या कोणत्या भागावर कोणाचे राज्य होते, याची माहिती मिळते. इतिहास अधिक रंजक पद्धतीने समजून घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे, असेही मोदी म्हणाले.
‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदी यांनी युवकांना नशेपासून दूर ठेवणे, राष्ट्रभावना मजबूत करणे आणि देशाच्या इतिहासाबद्दल उत्सुकता निर्माण करण्यावर विशेष भर दिला.