साखर आणि गुळाच्या दरात मोठी घसरण, ऐन सणासुदीत केंद्राकडून खुशखबर.,,

Share

पुणे: देशात सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन, केंद्र सरकारने परदेशांतून साखरेची आयात करण्याची परवानगी दिली आहे. गणेशोत्सवापूर्वीच साखर आणि गुळाचे दर कमी होणार असल्याने, ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुण्याच्या घाऊक बाजारात साखर आणि गुळाच्या दरांत घसरण झाली आहे. गेल्या आठवड्या साखरेच्या दरात किलोमागे सुमारे १५ रुपये तर गुळाच्या दरात ७ ते ८ रुपयांची घट झाली आहे.

श्रावणातील पहिल्या पंधरवड्यात साखरेसाठी अधिक पैसे मोजणाऱ्या ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखर आणि गूळ स्वस्त होण्याची शक्यता आहे. जूनपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत होती. श्रावणातील सण-उत्सवांमुळे घरगुती ग्राहकांसह प्रक्रिया उद्योगांकडून साखरेची मागणी वाढली होती.

गेल्या हंगामातील कमी उत्पादन आणि पावसाला झालेल्या विलंबामुळे नवीन हंगामातील साखर उत्पादन उशिरा सुरू होण्याची शक्यता असल्याने दरवाढ झाली होती. साखरेपाठोपाठ गुळाचे दरही वाढले होते. मात्र, आता आयात साखरेला परवानगी मिळाल्याने बाजारातील उपलब्धता वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या काळात साखर आणि गुळाची मागणी वाढणार असतानाच दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

देशात व्यापाऱ्यांनी भाववाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मोठ्या प्रमाणात साठेबाजी आणि अतिरिक्त खरेदी झाल्याची शक्यता आहे. परंतु सरकारने देशात पुरासा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. बाजारात साखरेचा साठा वाढवण्यासाठी सप्टेंबरपासून नवीन पद्धतीचा स्वीकार करणार आहे. सरकार मासिक कोटापद्धतीऐवजी १५ दिवसांची कोटा पद्धत लागू करणार आहे. या नियमानुसार, साखर कारखान्यांना निश्चित कोट्यापैकी ४० टक्के साखर पहिल्या आठवड्यात विकावी लागणार आहे. त्यानंतर उर्वरित साखर पुढील आठवड्यात विकावी लागणार आहे. यामुळे साखरेच्या साठेबाजीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नव्या नियमामुळे साखरेची मागणी आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यास सोपे जाणार आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास सरकारकडून अतिरिक्त कोटा देखील जारी केला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *