पुणे : माजी विद्यार्थी मंडळ, विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे यांच्या वतीने मावळ तालुक्यातील पूरग्रस्त वनवासी कातकरी कुटुंबांना मदतीचा हात देत किराणा साहित्य व ताडपत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माऊ, फळणे, साई, सावळा आणि डोंगरवाडी या गावांतील गरजू कुटुंबांना अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
राज्यासह पुणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत माजी विद्यार्थी मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त कुटुंबांना मदत पोहोचवली. प्रत्येक कुटुंबाला धान्य, डाळी, तेल, साखर, मीठ, तसेच इतर किराणा साहित्याचे किट आणि ताडपत्री देण्यात आली. या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे, खजिनदार देविदास टीळे, सदस्य संतोष घारे, गणेश ननवरे आणि स्थानिक समन्वयक शशिकांत आल्हाट उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लाभार्थी कुटुंबांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गणेश काळे यांनी सांगितले की, ‘विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्तीच्या काळात समाजाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक सेवा आहे.’
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सदस्यांनी व माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. मदत मिळाल्याने पूरग्रस्त कातकरी कुटुंबांनी माजी विद्यार्थी मंडळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.